१४५ कोटींच्या ड्रग्स प्रकरणात एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टचे नाव; ठाकरे गटाचे थेट अमित शाहांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 19:48 IST2025-12-19T19:47:54+5:302025-12-19T19:48:17+5:30
निष्पक्ष चौकशीसाठी एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद सोडावे अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे.

१४५ कोटींच्या ड्रग्स प्रकरणात एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टचे नाव; ठाकरे गटाचे थेट अमित शाहांना पत्र
Satara Savri Drugs Case: सातारा जिल्ह्यातील सावरी गावात मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत जप्त करण्यात आलेल्या ४५ किलो एमडी ड्रग्स प्रकरणाने आता राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला आहे. जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत १४५ कोटी रुपये असून, या प्रकरणाचे धागेदोरे थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबापर्यंत जात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. या प्रकरणी ठाकरे गटाच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्यावर निशाणा साधला. "ज्या शेडमध्ये ड्रग्स बनवले जात होते, तिथे काम करणाऱ्या तिघांना प्रकाश शिंदे यांच्या जावळी तालुक्यातील हॉटेल तेज यश मधून जेवण पुरवले जात होते," असा दावा अंधारे यांनी केला. या आरोपाने पोलीस प्रशासन आणि सत्ताधारी गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
खासदार अरविंद सावंत आणि प्रियंका चतुर्वेदींचे अमित शाहांना पत्र
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून खासदार अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. अमली पदार्थ साठवलेल्या शेडपासून तेज यश रिसॉर्टपर्यंत थेट रस्ता का बांधण्यात आला? या मार्गाचा हेतू काय होता? असा सवाल अरविंद सावंत यांनी केला.
हे रिसॉर्ट कोयना धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात असून ते बेकायदेशीर असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. जलसाठ्यापासून ठराविक अंतरात बांधकाम करण्यास मनाई असताना याला परवानगी कोणी दिली? इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची हालचाल सुरू असताना स्थानिक सातारा पोलिसांना याची माहिती कशी नव्हती? राजकीय दबावामुळे कारवाई टाळण्यात आली का? असाही सवाल पत्रातून विचारण्यात आला आहे.
"चौकशी होईपर्यंत उपमुख्यमंत्र्यांना पदावरून हटवा"
खासदार अरविंद सावंत यांनी, जोपर्यंत या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होत नाही, तोपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पदावरून बाजूला करावे, अशी मागणी केली. अंमली पदार्थांचे रॅकेट आणि सत्ताधारी कुटुंबाचे नाव एकाच चौकटीत आल्याने ही राष्ट्रहिताच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
ड्रग्स प्रकरणाची व्याप्ती
मुंबई पोलिसांनी सुरुवातीला मुलुंडमध्ये छापा टाकून काही ड्रग्स जप्त केले होते. त्यानंतर विशाल मोरे या आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार साताऱ्यातील दुर्गम सावरी गावात दोन शेडवर छापा टाकला असता, तब्बल ४५ किलो एमडी ड्रग्सचा साठा सापडला.