योग्य निर्णय घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत, जरागेंनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा; फडणवीसांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 17:15 IST2023-10-29T17:12:57+5:302023-10-29T17:15:01+5:30
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधत मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.

योग्य निर्णय घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत, जरागेंनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा; फडणवीसांचे आवाहन
मराठा आरक्षणासाठी अन्न-पाणी त्याग करून आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आज चांगलीच खालावली आहे. जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवसापासूनच उपचार घेण्यास नकार दिला आहे. मला बोलता येते तोपर्यंत तुम्ही चर्चेला या, आरक्षण द्यायचे की नाही ते सांगा, असेही जरांगे पाटील म्हणाले.
महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी प्रवर्गातून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दुसरा टप्प्यात होणाऱ्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशी सकाळी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली दिसून आली. जरांगे पाटील यांनी अन्न-पाण्याचा त्याग केल्याने त्यांना निटसे बोलताही येत नव्हते.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधत मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. मनोज जरांगे यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, डॉक्टरांची टीम त्यांच्यासोबत आहे. शेवटी जीव अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे जरांगे पाटलांसोबत असणाऱ्यां लोकांनी त्यांची काळजी घेण्याची गरज आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालून आहे. जो काही योग्य निर्णय असेल तो घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मला वाटतं त्यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा, असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केले.
🕒 3.10pm | 29-10-2023 📍 Nagpur | दु. ३.१० वा. | २९-१०-२०२३ 📍 नागपूर.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 29, 2023
LIVE | Media interaction.#Maharashtra#Nagpurhttps://t.co/QRG25el0k0
दरम्यान, जरांगे पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. मराठा बांधवांनी एकजूट व्हावे. फुटू देऊ नये. महाराष्ट्रात जिथे, जिथे साखळी उपोषण आहे तिथे आमरण उपोषणाला सुरुवात करावी. प्रत्येक पोलिस ठाण्यात परवानगीचा अर्ज द्यावा. जेणेकरून सरकारला किती ठिकाणी उपोषण सुरू आहे हे समजेल. उग्र आंदोलन करू नका, आत्महत्या करू नका, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले. सरकारकडून अद्याप संवाद साधण्यात आला नाही. प्रश्नांची उत्तरेही मिळाली नाहीत. आम्ही त्यांच्याकडून उत्तर घेवू. मला बोलायला त्रास होतोय. मी जास्त बोलू शकत नसल्याचं जरांगे पाटली यांनी सांगितले.