"फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्यकारभार हाकताहेत, त्यांच्या मंत्रिमंडळातील एकेक मंत्री एकेक नमुना"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 18:41 IST2025-03-15T18:40:02+5:302025-03-15T18:41:07+5:30

Harshvardhan Sapkal Criticize Mahayuti Government: देवेंद्र फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्यकारभार हाकत असून, त्यांच्या मंत्रिमंडळात एक एक मंत्री एक एक नमुना आहे, अशा मंत्र्यांमुळे राज्यातील सद्भाव, विवेक, महाराष्ट्र धर्म नष्ट होत आहे. भाजपा सरकारच्या कार्यपद्धतीमुळे राज्यातील जातीय सलोखा बिघडत आहे, अशी टीक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

"Each minister in Devendra Fadnavis' cabinet is a model", Harshvardhan Sapkal's blunt criticism | "फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्यकारभार हाकताहेत, त्यांच्या मंत्रिमंडळातील एकेक मंत्री एकेक नमुना"

"फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्यकारभार हाकताहेत, त्यांच्या मंत्रिमंडळातील एकेक मंत्री एकेक नमुना"

सिंधुदुर्ग -  महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, सत्ताधारी पक्षातील लोक दहशत निर्माण करत आहेत. संसदीय लोकशाहीची पायमल्ली केली जात आहे. जाती धर्मातील एकोप्याची भावना नष्ट केली जात आहे. आज विविधतेत एकता या मुळ गाभ्याला धोका निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्यकारभार हाकत असून, त्यांच्या मंत्रिमंडळात एक एक मंत्री एक एक नमुना आहे, अशा मंत्र्यांमुळे राज्यातील सद्भाव, विवेक, महाराष्ट्र धर्म नष्ट होत आहे. भाजपा सरकारच्या कार्यपद्धतीमुळे राज्यातील जातीय सलोखा बिघडत आहे, अशी टीक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कोकणाला निसर्ग सौंदर्य व संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे, कोकणच्या या भूमीत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वी. स. खांडेकरांचा जन्म झाला, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते तुमचे आमचे सेम असते असा प्रेमाचा संदेश देणारे  मंगेश पाडवगावर यांचा हा जिल्हा, मधू दंडवते, नाथ पै यांच्यासारख्या महान नेत्यांचा हा जिल्हा आहे, एकापेक्षा एक सरस खासदार या जिल्ह्यातून झाले, ज्यांनी सभ्यता, संस्कृती व लोकशाही मुल्ये कशी असतात याचा आदर्श घालून दिला आहे. आज त्याच जिल्ह्यातील काही लोकांच्या तोंडातून दररोज गटारगंगा वाहत आहे. एक मंत्री हम करे सो कायदा म्हणतो, दुसरा आमदार सैराट आहे. आमच्या पक्षात नाही तर निधीच देणार नाही अशी धमकी दिली जाते, हा सर्व प्रकार महाराष्ट्र धर्म नासवण्याचा प्रकार आहे. 
नारायण राणे हे दुसऱ्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले ते १२ वर्ष काँग्रेसमध्ये राहिले त्यातील ९ वर्षे ते सत्तेत राहिले, त्यांचा पराभव झाल्यानंतर विधान परिषदेवर त्यांना निवडून दिले, पण नंतर ते कडबोळे घेऊन दुसऱ्य़ा पक्षात गेले. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते व सत्ता होती म्हणून ते आले होते व सत्ता नाही हे दिसताच ते परत गेले. ते जरी गेले असले तरी या जिल्ह्यात काँग्रेसचा कार्यकर्ता व काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे, असे सपकाळ म्हणाले. 

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला कोकणात सामाजिक तेढ निर्माण करायचे आहे, संस्कृती मोडून काढायची आहे. आगामी काळात हा जिल्हा काँग्रेसमय करा, काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. रस्त्यावर उतरा, आंदोलन करा, जनतेचे प्रश्न हाती घेऊन काम करा. पुष्पा चित्रपटातील झुकेगा नही साला या भावनेने काम करा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय झाला पाहिजे, प्रत्येक तालुका, वार्ड, ग्रामपंचायतीत काँग्रेसचा कार्यकर्ता दिसला पाहिजे. काँग्रेस एक चळवळ आहे, काँग्रेसचा विचार जिवंत ठेवा, हा विचार जिल्ह्यातील घरोघरी पोहचवा असे आवाहन सपकाळ यांनी केले. 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर २०० वर्षानंतर महात्मा फुलेंनी त्यांची समाधी शोधून काढली या दोनशे वर्षामध्ये भाजपाच्या त्याकाळातील पिल्लावळींना महाराजांचा इतिहास पुढे आणू द्यायचा नव्हता, आताही शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा एकही पुरावा ठेवायचा नाही यातून काही विध्वंसह घटना या लोकांना करायच्या आहेत. या विखारी विचारसरणीला थांबवावे लागणार आहे. असेही सपकाळ म्हणाले.

Web Title: "Each minister in Devendra Fadnavis' cabinet is a model", Harshvardhan Sapkal's blunt criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.