Navratri: दुर्गेच्या जागरात यंदा नवरात्री नव्हे दहा रात्री; दसरा अकराव्या दिवशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:43 IST2025-09-16T15:41:55+5:302025-09-16T15:43:11+5:30
गरबा, दांडियाला चढणार रंग

Navratri: दुर्गेच्या जागरात यंदा नवरात्री नव्हे दहा रात्री; दसरा अकराव्या दिवशी
कोल्हापूर : महिषासूर मर्दिनी, आदिशक्ती, दुर्गेचा जागर करणारा नवरात्रोत्सव यंदा नऊ रात्री नव्हे तर दहा रात्री असणार आहे. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंतच्या याकाळात तिथीची वृद्धी झाली असून, अकराव्या दिवशी दसरा आहे. त्यामुळे देवीच्या जागरासाठी, गरबा-दांडियासाठी आणखी एक दिवस मिळणार आहे.
असुरांचा संहार करणाऱ्या, स्त्रीशक्तीची प्रचिती देणारा नवरात्रोत्सव म्हणजे देवीचा जागर. वर्षभरातील सर्व सणावारांमध्ये तसा हा कडक आणि कठोर उपासनेचा, काटेकोर धार्मिक विधींचा उत्सव. देवीचा महिषासुराशी युद्ध सुरू झालेल्या दिवशी घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होते, अष्टमीला देवीने राक्षसाचा वध केला. खंडेनवमीला शस्त्रांची पूजा आणि देवीच्या विजयोत्सवाचा जल्लोष म्हणजे दसरा असा हा उत्सव. ९ ते दहा दिवसांचा उत्सव. यंदा मात्र त्यात एक दिवस तिथीची वृद्धी आली आहे. त्यामुळे यंदाच्या नवराेत्सवात दहा रात्री असणार आहेत. अकराव्या दिवशी दसरा आहे.
वाचा : पैसे नाहीत हातात अन् म्हणे दसरा महोत्सव करा थाटात
गरबा, दांडियाचा उत्साह
नवरात्रोत्सवात ठिकठिकाणी गरबा दांडियाचे कार्यक्रम होतात. विशेषत: गुजराती, मारवाडी समाजबांधव त्यांच्या पारंपरिक गीतांवर अगदी लयबद्धपणे नृत्य करतात. यासह इव्हेंट मॅनेजमेंट संस्था, महिला मंडळ, तरुण मंडळांच्या वतीनेदेखील याचे आयोजन केले जाते. यंदा एक दिवस जास्तीचा मिळणार आहे.
असा आहे नवरात्रोत्सव
- घटस्थापना : २२ सप्टेंबर
- ललिता पंचमी (अंबाबाई-त्रयंबोली देवी भेट) : २७ सप्टेंबर
- जोतिर्लिंग जागर (जोतिबा डोंगर) : २९ सप्टेंबर
- अष्टमीचा जागर, अंबाबाईची नगरप्रदक्षिणा : ३० सप्टेंबर
- खंडेनवमी : १ ऑक्टोबर
- विजयादशमी, दसरा : २ ऑक्टोबर