Due to water conservation efforts, significant agricultural production in drought - Devendra Fadnavis | जलसंधारणाच्या कामांमुळे दुष्काळातही लक्षणीय कृषी उत्पादन - देवेंद्र फडणवीस
जलसंधारणाच्या कामांमुळे दुष्काळातही लक्षणीय कृषी उत्पादन - देवेंद्र फडणवीस

मुंबई : जलसंधारणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने लक्षणीय कामगिरी केल्याने मागील वर्षी कमी पाऊस होऊनही राज्यात सुमारे ११६ लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन घेतले असून आजवरची सर्वाधिक ४,७०० कोटींची मदत केंद्र सरकारने दुष्काळ निवारणास दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारचे आभार मानले.

नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात नीती आयोगाच्या प्रशासकीय समितीची ५ वी बैठक मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाली. आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भूपृष्ठ व रस्ते वाहतूक तथा सूक्ष्म, मध्यम व लघू उद्योग मंत्री नितीन गडकरी, अन्य केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, नायब राज्यपाल उपस्थित होते.

दुष्काळ निवारणाची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, पाणी टंचाई जाणवणाऱ्या सर्व गावे आणि वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यासोबतच चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून दुष्काळी भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी विविध सवलती देण्यात आल्या आहेत. मराठवाडा-विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात कृत्रिम पाऊस पाडण्याची योजना सरकारने आखली असून त्यासाठी एयर क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येईल. त्यासाठी ३० कोटींची तरतूद शासनाने केली आहे.

मागील वर्षी सरासरीच्या केवळ ७३ टक्के पाऊस होऊनही राज्यात ११५.७० लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन घेण्याची कामगिरी शक्य झाल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार अशा सरकारच्या विविध योजना-अभियानांमुळे मोठ्या प्रमाणावर लाभ झाला आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचीही अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पिंपरी-चिंचवड, पुणे आणि ठाणे महापालिका क्षेत्रांमध्ये यासाठी १३ हजारांहून अधिक आराखडे मंजूर करण्यात आले आहेत. विविध स्वयंसेवी आणि अशासकीय संस्था, कॉपोर्रेट क्षेत्राच्या मदतीने नंदुरबार, उस्मानाबाद, वाशिम आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये अनेक लोककल्याणकारी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू आहे.

नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
नक्षलवादाचा बिमोड करण्यात वर्षभरात महाराष्ट्र पोलिसांनी आजवरची सर्वोत्तम अशी कामगिरी बजावताना ५० नक्षल्यांना संपवले. तर ५ वर्षांत १५४ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. उत्तम आंतरराज्यीय समन्वय आणि संयुक्त मोहिमांमुळे या अभियानाला यश मिळाल्याचे ते म्हणाले.


Web Title: Due to water conservation efforts, significant agricultural production in drought - Devendra Fadnavis
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.