राज्यातील आरोग्य मित्र न्यायाच्या प्रतीक्षेत, बुधवारपासून संपावर जाणार; नेमक्या मागण्या काय..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 12:20 IST2025-02-08T12:20:24+5:302025-02-08T12:20:53+5:30
बैठक बोलावण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आश्वासन : प्रश्न मार्गी लागल्यास आंदोलन मागे

संग्रहित छाया
कोल्हापूर : महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जनआरोग्य योजनेचे काम करणाऱ्या आरोग्य मित्रांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे राज्यातील आरोग्य मित्र बुधवार, दि. १२ फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती डॉ. डी. एल. कराड यांनी दिली.
सीआयटीयू संलग्न असलेल्या आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेने १८ जानेवारीला राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलनाचे पत्र दिले होते. आरोग्य मित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे सचिव किरण ढमढेरे यांनी एमआरटीयू आणि पीयूएलपी कायद्याचे कलम २४ (१) मधील तरतुदीनुसार १२ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्य आरोग्य हमी सोसायटीला आणि सहायक संस्थांना कायदेशीर २१ दिवसांची नोटीसही दिली आहे. या कालावधीत जर आरोग्यमित्रांच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर मदत काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.
पूर्वी झालेल्या बैठकीत आरोग्य मित्रांची वेतनवाढ आणि इतर समस्यांसंदर्भात सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली होती. त्याचवेळी राज्य आरोग्य सोसायटीने आचारसंहितेपूर्वी आरोग्य मित्रांच्या सर्व मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणुका होऊन गेल्या तरी निर्णय न झाल्याने आरोग्यमित्र आक्रमक झाले आहेत. -गणेश पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा आरोग्यमित्र संघटना
संपापूर्वीच बैठक शक्य
दरम्यान, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी अध्यक्ष डॉ. कराड यांनी २ फेब्रुवारी रोजी संपाबाबत चर्चा केली होती. यात टीपीए आणि राज्य आरोग्य हमी सोसायटीसोबत एक बैठक बालावण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे. आरोग्य मित्रांना न्याय देण्यासाठी संपापूर्वीच ही बैठक होण्याची शक्यता आहे.
आरोग्य मित्रांच्या प्रमुख मागण्या
किमान वेतन कायद्यानुसार २६ हजार खास भत्ता, महागाई भत्ता, तसेच पेट्रोल भत्ता मिळावा.
दरवर्षी १० टक्के वेतनवाढ व्हावी, नियमानुसार आणि कायदेशीर रजा द्याव्यात