आमच्या सरकारचं ड्रायव्हिंग अजितदादांकडे; उद्धव ठाकरेंची मिश्कील प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 14:51 IST2020-01-16T14:51:14+5:302020-01-16T14:51:24+5:30
बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित ‘कृषिक’ या प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.

आमच्या सरकारचं ड्रायव्हिंग अजितदादांकडे; उद्धव ठाकरेंची मिश्कील प्रतिक्रिया
मुंबई : लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात शिवसेनेचे जेष्ठ नेते व खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांना 'स्टेपनी'ची उपमा देत, स्टेपनीशिवाय सरकार चालू शकत नसल्याचे म्हंटले होते. त्यांनतर आता आमच्या सरकारचं ड्रायव्हिंग अजितदादांकडे असल्याचे मुख्यंमत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहे. बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कृषिक प्रदर्शनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्यांनतर ते पत्रकारांशी बोलत होते.
बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित ‘कृषिक’ या प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. कृषी विज्ञान केंद्राचं कार्यालय पाहून झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे अजित पवार ड्रायव्हिंगला बसलेल्या कारमध्ये बसले. तर आमच्या सरकारचं ड्रायव्हिंग अजितदादांकडे आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी मिश्किलपणे म्हणाले.
तर यावेळी मुख्यमंत्र्यांनी घड्याळाबद्दलचा सुद्धा एक किस्सा सांगितला. 'सुप्रिया सुळे मला विचारत होत्या की तुमचं घड्याळाचं दुकान आहे का? मी त्यांना उत्तर दिलं, माझं घड्याळाचं दुकान नाही. पण घड्याळवाले माझे पार्टनर आहेत.' उद्धव यांनी हा किस्सा सांगितल्यानंतर सभास्थळी खसखस पिकली. अनेकदा चांगली कामं होण्यासाठी वेळ जुळून यावी लागते. आपलं सरकार अगदी योग्य वेळी राज्यात सत्तेवर आलं आहे, असं उद्धव यावेळी म्हणाले.