महाराष्ट्र निवडणूक 2019: ''मसुदा नको, पत्र असेल तरच चर्चेला या''; संजय राऊत यांनी ठेवली गडकरींसमोर अट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 15:56 IST2019-11-08T15:55:07+5:302019-11-08T15:56:34+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : गडकरी यांनी सकाळीच गरज पडली तर मी मध्यस्थी करण्यासाठी तयार असल्याचे वक्तव्य केले होते.

महाराष्ट्र निवडणूक 2019: ''मसुदा नको, पत्र असेल तरच चर्चेला या''; संजय राऊत यांनी ठेवली गडकरींसमोर अट
मुंबई : मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने भाजपाला खिंडीत पकडले आहे. यामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 15 दिवस उलटत आले तरीही युतीला सरकार स्थापन करण्यास अपयश आले आहे. यातच भाजपा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरील चर्चेची अट ठेवत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी फोन करावा, असे सांगितल्याने भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी मुंबईत दाखल झाले आहेत.
गडकरी यांनी सकाळीच गरज पडली तर मी मध्यस्थी करण्यासाठी तयार असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर ते नागपुरहून मुंबईला आले आहेत. यामुळे गडकरी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार असल्याचे स्पष्ट होत असतानाच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गडकरींसमोर मोठी अट ठेवली आहे.
भाजपा- शिवसेना युतीचे सरकार बनण्यासाठी भाजपाने 50-50 टक्के सत्तेत वाटा देण्याची तयारी दर्शविली आहे. याचा मसुदाही तयार करण्यात आला आहे. हा मसुदा घेऊन नको तर मुख्यमंत्री पदाबाबतचे अधिकृत पत्र असेल तरच गडकरींनी चर्चेला यावे असा इशारा राऊत यांनी गडकरींना दिला आहे. आम्हाला मुख्यमंत्री पदाचे पत्र हवे, असे राऊत यांनी सांगितले आहे. यामुळे गडकरी नेमके काय घेऊन ठाकरेंशी चर्चा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, संजय राऊत हे तातडीने राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला आले असून गेल्या आठवडाभरात त्यांनी तिसऱ्यांदा पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट दिली आहे. यामुळे एकीकडे भाजपाचे नेते ठाकरेंकडे जाण्याच्या तयारीत असताना राऊत यांनी पवारांचे निवासस्थान गाठल्याने चर्चेला उधान आले आहे. यातच काही वेळापूर्वी रामदास आठवलेंनी पवार यांची भेट घेतली आहे.