अमृता फडणवीस धमकी प्रकरणावर बोलू नका; शरद पवारांच्या सर्व NCP नेत्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 15:19 IST2023-03-28T15:18:28+5:302023-03-28T15:19:28+5:30
पोलीस जाणुनबुजून करतायेत. शरद पवारांना भेटणे, संपर्क साधणे हे जगात कुणालाही शक्य आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

अमृता फडणवीस धमकी प्रकरणावर बोलू नका; शरद पवारांच्या सर्व NCP नेत्यांना सूचना
मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि १ कोटींची लाच दिल्याप्रकरणी आरोपी अनिल जयसिंघानी आणि अनिक्षा जयसिंघानी दोघेही अटकेत आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यातच अनिल जयसिंघानी पवारांच्या संपर्कात होते असा दावा पोलीस चौकशीत अनिक्षा जयसिंघानी केला. मात्र या प्रकरणावर पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी बोलू नये अशा सूचना शरद पवार यांनी NCP च्या सर्व नेत्यांना दिल्या आहेत.
या आरोपावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पोलीस जाणुनबुजून करतायेत. शरद पवारांना भेटणे, संपर्क साधणे हे जगात कुणालाही शक्य आहे. कुणाचाही फोन आला तरी ते उचलतात. कारण नसताना या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नका. आम्ही या प्रकरणात कुठे काहीही बोलत नाही. ८३ वर्षाचे शरद पवार आहेत. मला स्वत: या प्रकरणात पक्षाच्या कुठल्याही नेत्याला बोलायला देऊ नको अशी सूचना शरद पवारांनी केली होती असं त्यांनी सांगितले.
शरद पवारांवर आरोप
अमृता फडणवीस यांना १ कोटींची लाच दिल्याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानीने मोठा दावा केला आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना पाठवलेल्या एका मेसेजमध्ये म्हटले आहे की, तिचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सतत संपर्कात आहेत, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी विशेष न्यायालयाला दिली.
या कटात आणखी काही राजकीय नेत्यांचा समावेश असावा. त्यामुळे आणखी तपास करणे आवश्यक आहे, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणे व त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या अनिक्षा जयसिंघानीच्या जामीन अर्जाला विरोध करताना पोलिसांनी उपरोक्त माहिती न्यायालयाला दिली. २४ मार्चला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर अनिक्षाने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. न्या. ए. अल्माले यांनी तिचा जामीन मंजूर केला.