मुंबई - मनसे आणि उद्धवसेना यांच्यातील युतीचा विषय संवेदनशील आहे. त्यामुळे २९ एप्रिलपर्यंत कोणीही या विषयावर बोलू नका, अशा सूचना परदेश दौऱ्यावर असणारे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षनेत्यांना दिल्या आहेत, अशी माहिती मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहेत. त्यावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, असे बॅनर्स झळकले आहेत, तर मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे, कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण, मुंबई शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार, चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मात्र युतीविरोधात भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज यांनी पक्षातील नेत्यांना केलेली ही सूचना महत्त्वाची मानली जात आहे.
मैत्रीच्या जगातले राजेराज यांनी उद्धव यांच्याशी युती करण्याची प्राथमिक इच्छा बोलून दाखविली. त्यावर राज यांचे खास मित्र, भाजप नेते आशिष शेलार यांनी अनेक वर्षांच्या मैत्रीला तिलांजली देत असल्याचे विधान केले. त्यावर, शेलार यांनी मैत्री तोडल्यामुळे आमचा पक्ष, नेते, राज यांचा परिवार, आम्ही सर्वच धक्क्यात आहोत. आम्हाला अतिव दुःख झाले असून काहींनी अन्न-पाणी सोडले आहे. या दुःखातून बाहेर कसे पडावे याची चिंता आहे, असा टोला मनसे नेते महाजन यांनी लगावला.राज यांच्या डोक्याला बंदूक लावून कोणी काहीही मान्य करून घेऊ शकत नाही हे शेलार यांना कळायला हवे होते. मनसेने कधी शेलारांविरोधात उमेदवार दिला नाही. राज ठाकरे मैत्रीच्या जगातले राजे आहेत. त्यांच्यासारखा मित्र गमावणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे, अशी टिपण्णीही महाजन यांनी केली.