वर्षानुवर्षे प्रकल्प लटकवू नका, तीन वर्षांतच पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:43 IST2025-08-05T11:43:21+5:302025-08-05T11:43:46+5:30

पायाभूत प्रकल्पांतील अडचणी सोडविण्यासाठी वॉररूम आढावा बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी पुढील बैठकीपूर्वी करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.  मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे यांनी सादरीकरणाद्वारे वॉररूम प्रकल्पांची माहिती बैठकीत दिली. 

Don't delay projects for years, complete them within three years; CM directs | वर्षानुवर्षे प्रकल्प लटकवू नका, तीन वर्षांतच पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

वर्षानुवर्षे प्रकल्प लटकवू नका, तीन वर्षांतच पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्षे चालू न राहता ते प्रकल्प हाती घेतल्यानंतर तीन वर्षांत पूर्णत्वास यायला हवेत, असे निर्देश मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.  
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री वॉररूमधील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा  मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीस मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तर दूरदृश्यप्रणालीद्वारे विविध विभागांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

फडणवीस यांनी बैठकीत ३० प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, आपल्याकडे तंत्रज्ञान अद्ययावत आहे. त्यामुळे कमी कालावधीत प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत. मुंबईसह राज्यातील सर्व मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठीच्या अडचणींचे निराकरण वेळेत करण्यात यावे. मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात यावे. मेट्रो प्रकल्प तसेच इतर सुविधा प्रकल्पांसाठी लागणारा निधी तातडीने वितरित करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहेत. 

...तत्पूर्वी निर्णय अपेक्षित
पायाभूत प्रकल्पांतील अडचणी सोडविण्यासाठी वॉररूम आढावा बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी पुढील बैठकीपूर्वी करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.  मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे यांनी सादरीकरणाद्वारे वॉररूम प्रकल्पांची माहिती बैठकीत दिली. 

बीडीडी चाळवासीयांना लवकरच सदनिका   
मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवाशांना लवकरच सदनिकांचे वाटप करता येईल. तसेच नायगाव व एन.एम. जोशी मार्ग चाळीतील रहिवाशांना ठरलेल्या वेळेत सदनिका देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.  

या प्रकल्पांचा घेतला बैठकीत आढावा  
बीडीडी चाळ, मुंबईतील मेट्रो लाइन ४  (वडाळा ते कासारवडवली), मेट्रो लाइन ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण), मुंबई मेट्रो ६ (स्वामी समर्थनगर-विक्रोळी), मेट्रो लाइन २ बी (डीएन नगर ते मंडाळे),  मुंबई मेट्रो ७ ए (अंधेरी-छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २), मुंबई मेट्रो लाइन ९ (दहिसर (पू) ते मिरा भाईंदर), ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह टनेल, बोरिवली ते ठाणे जोड बोगदा, उत्तन-विरार सी लिंक, शिवडी-वरळी इलेव्हेटेड कॉरिडॉर, पुणे मेट्रो, दहिसर ते भाईंदर लिंक रोड, गोरेगाव मागाठाणे डीपी रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड आणि उत्तर सागरी किनारा मार्ग, विरार अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर, धारावी पुनर्विकास, जालना-नांदेड महामार्ग, पुणे रिंगरोड, वांद्रे वर्सोवा सी लिंक, छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा, कुडूस आरे कनेटिव्हिटी, कुडुस बाभळेश्वर वीज जोडणी प्रकल्प, शिक्रापूर बाभळेश्वर विद्युत प्रकल्प, वाढवण बंदर प्रकल्प.  

Web Title: Don't delay projects for years, complete them within three years; CM directs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.