‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
By यदू जोशी | Updated: September 30, 2025 06:12 IST2025-09-30T06:12:25+5:302025-09-30T06:12:41+5:30
प्रमुख राजकीय पक्षांना स्वबळाचे वेध, स्थानिक पातळीवर अधिकारावर भर

‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीदेखील लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे एकसंध राहणार नाही असे दोन्हींकडील काही नेत्यांच्या विधानांवरून स्पष्टपणे दिसत आहे. राजकीय अपरिहार्यता असलेल्या ठिकाणीच महायुती वा मविआ एकत्र दिसतील, बहुतांश ठिकाणी कालचे मित्र आजचे विरोधक असल्याचे चित्र असेल.
अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी आपला पक्ष या निवडणुकांत स्वबळावर लढेल आणि तशा सूचना पक्षजनांना दिल्या आहेत, असे सोमवारी गोंदियामध्ये सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस स्वबळावर लढणार, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. ‘काँग्रेस स्वबळावर लढल्यास आपल्याला आश्चर्य वाटणार नाही’ असे विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही केले आहे. त्यातच उद्धवसेनेचा राज ठाकरे यांच्याशी युती करण्याकडे वाढता कल हेही उद्धवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे मोठे कारण असेल असे मानले जात आहे. या निवडणुकांत जे यश मिळायचे ते मिळेल पण आपण स्वबळावर लढले पाहिजे, तसे केल्याने मोठे यश मिळेल, असे नाही पण त्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पोहोचेल. आघाडीच्या राजकारणात काँग्रेसचा झालेला संकोच आणखी होऊ द्यायचा नसेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांत एकदाचे वेगळे लढूनच घ्या, असे मानणारा वर्ग प्रदेश काँग्रेसमध्ये आहे.
काही ठिकाणी युती तर कुठे स्वबळावर!
महायुती मुंबई महापालिकेत एकत्र येईल, पण ठाण्यात तशी शक्यता नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांपूर्वीच म्हटले आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगरात स्वबळावर लढा असा आग्रह भाजपच्या तेथील नेत्यांनी प्रदेशच्या नेत्यांकडे धरला आहे. नाशकातही महायुती एकत्र येण्याची शक्यता कमीच आहे.
विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमधील भाजपच्या नेत्यांना शिंदेसेना वा अजित पवार यांच्यासोबत युती नको आहे. नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर या महापालिकांमध्ये भाजपला स्वबळाचे वेध लागले आहेत.
अनेक नगरपालिकांमध्ये आपल्याकडे चांगले चेहरे आहेत, त्यामुळे युतीची गरज नाही असा भाजपमध्ये आम सूर आहे. वेगवेगळे लढू आणि जिल्हा परिषद, महापालिकांमध्ये सत्तेसाठी गरजेनुसार एकत्र येऊ, असा पर्यायही खुला आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळही आग्रही
स्वबळावर लढण्यासाठी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे त्यासाठी आग्रही असल्याचे ते देत असलेल्या संकेतांवरून दिसत आहे. मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढावी, अशी भूमिका मुंबईतील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आधीच त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे.