ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचा फोन न घेतल्यानं डॉक्टर निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 17:49 IST2020-02-05T17:47:33+5:302020-02-05T17:49:39+5:30
एकाचवेळी अनेक रुग्णांवर उपचार सुरू असल्यानं डॉक्टरांना मंत्र्यांचा फोन घेता आला नाही

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचा फोन न घेतल्यानं डॉक्टर निलंबित
यवतमाळ: महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचा फोन न घेतल्यानं एका कनिष्ठ निवासी डॉक्टरला सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले. सोमवारी (३ फेब्रुवारी) संध्याकाळी ५.३० वाजता यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) हा प्रकार घडला.
वैद्यकीय पदव्युतर अभ्यासक्रमाला शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून अपघात कक्षात ड्युटी होती. एकाच वेळी सहा रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांची त्यांच्यावर उपचार करताना तारांबळ सुरू होती. तेवढ्यात राजकीय वशीला घेऊन आलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने थेट मंत्र्यांना फोन लावला. उपचारात व्यस्त असलेल्या डॉक्टरला ‘तुमच्यासाठी भाऊंचा फोन आहे’ असे सांगितले. मात्र ‘फोनपेक्षा मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णावर उपचार करणे गरजेचे आहे. मी तुझ्या भाऊंसोबत दहा मिनिटांनंतर बोलतो अथवा शक्य असेल तर तुझ्या भाऊलाच येथे घेऊन ये’ असे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.
रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यातले हे संभाषण फोनवर असलेल्या भाऊने ऐकले. यानंतर कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला दुसऱ्या दिवशी थेट सहा महिने निलंबन करण्यात आल्याचे पत्रच मिळाले. हा प्रकार पाहून या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याला जबर धक्का बसला. कुठलाही दोष नसताना केवळ फोन घेतला नाही म्हणून इतकी मोठी शिक्षा का, असा प्रश्न त्याने आपल्या वरिष्ठांपुढे उपस्थित केला.