जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:53 IST2025-06-18T15:51:59+5:302025-06-18T15:53:06+5:30

Thane Docter News: शिवनेरी रुग्णालयातील डॉ. प्रभू आहुजा यांनी जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याने एकच खळबळ माजली.

Doctor in Thane declares living man dead, faces investigation | जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा

जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा

उल्हासनगर: शिवनेरी रुग्णालयातील डॉ. प्रभू आहुजा यांनी जिवंत व्यक्तीला मृत घोषित करून मृत्यू प्रमाणपत्र दिल्याच्या घटनेची गंभीर दखल महापालिका आरोग्य विभागाने घेतली असून, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी रुग्णालयाला नोटीस पाठवून याबाबत खुलासा मागितला आहे. खुलासा समाधानकारक नसल्यास कारवाईचे संकेत डॉ. धर्मा यांनी दिले. उल्हासनगर कॅम्प नं. ४ परिसरात राहणारे अभिमान तायडे यांच्यावर यापूर्वी जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू होते. 

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना १५ दिवसांपूर्वी घरी आणले होते. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांची तब्येत बिघडल्याने नातेवाइकांनी त्यांना शिवनेरी रुग्णालयात नेले. बेशुद्धावस्थेत असलेल्या तायडे यांची रुग्णालयाचे प्रमुख डॉ. आहुजा यांनी रिक्षातच तपासणी करून मृत घोषित केले. तसेच मृत्यू प्रमाणपत्र दिल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर तायडे यांना घरी आणले. त्यांच्यावर अंत्यविधी करण्याची तयारी सुरू असताना तायडे यांनी हालचाल केल्याने त्यांना उपचारासाठी त्वरित क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यांची तब्येत ठणठणीत होऊन त्यांनी जेवण घेतले.

उत्तराकडे लागले लक्ष
शिवनेरी रुग्णालयाच्या डॉ. आहुजा यांनी जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले. अभिमान तायडे यांच्या नातेवाइकांना अभिमान यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याकरिता दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले होते. त्यानंतर तायडे यांच्या नातलगांनी आधार कार्ड आणून मृत्यू दाखला मागितला. त्यांच्यावर विश्वास ठेवून दाखला दिल्याचे डॉ. प्रभू यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी डॉ. धर्मा यांनी पाठविलेल्या नोटिशीला डॉ. आहुजा काय उत्तर देतात व त्यांचा दावा पालिका स्वीकारते का, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Doctor in Thane declares living man dead, faces investigation