"तुम्ही मुख्यमंत्री असताना झोपला होतात का?" 'त्या' मागणीवरून गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 09:32 IST2025-04-17T09:30:43+5:302025-04-17T09:32:21+5:30
"एवढे दिवस झोपला होतात का? आपण मुख्यमंत्री होतात, तेव्हा मागणी केली आपण? मुख्यमंत्री असताना आपण काय केलं तेथे?" असा सवाल भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.

"तुम्ही मुख्यमंत्री असताना झोपला होतात का?" 'त्या' मागणीवरून गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी नाशिकमधील पक्ष्याच्या निर्धार शिबिरात उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावरही थेट हल्ला चढवला. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खरोखरच आदर असेल, तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना दिले. यावर, "एवढे दिवस झोपला होतात का? आपण मुख्यमंत्री होतात, तेव्हा मागणी केली आपण? मुख्यमंत्री असताना आपण काय केलं तेथे? असा सवाल भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? -
शिवजयंतीनिमित्त देशभरात सुट्टी जाहीर करण्यासंदर्भात बोलताना, उद्धव ठाकरे म्हणाले होते, "शाहजी (अमित शाह), छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही सांगून कुणी महाराष्ट्रापुरते सिमित ठेवेले, नाही नाही. शिवाजी महाराज जगाच्या काना-कोपऱ्यात पोहोचले आहेत. पण तुम्हाला त्यांच्याबद्दल खरोखरच आदर असेल, तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा. इकडे येऊन केवळ मतांसाठी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' बोलू नका."
उद्धव ठाकरे यांच्या या विधानानंतर, गिरीश महाजन यांनीही पलटवार केला आहे. महाजन म्हणाले. "एवढे दिवस झोपले होते का? आपण मुख्यमंत्री होतात, तेव्हा मागणी केली आपण? मुख्यमंत्री असताना आपण काय केलं तेथे? ते ठरवतीलना, पंतप्रधान ठरवतील. शिवाजी महाराज तर आमच्यासाठी आदर्श आहेतच. तो काही प्रश्नच नाही. महाराष्ट्राला सुट्टी आहे. देशाचाही ते निर्णय घेतील. पण आपण मुख्यमंत्री असताना कधी गेलात का तेथे? कधी आपण बोललात का? कधी हा विषय काढला का? विनाकारण काही तरी, आता कामं शिल्लक राहिलेली नाहीत, म्हणून काही बोलायचे." महाजन टीव्ही ९ मराठीसोबत बोलतत होते.