माणसांच्या पदानुसार शब्दही बदलतात का? ठाकरेंचा सवाल; ओला दुष्काळ जाहीर करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 09:30 IST2025-10-02T09:29:45+5:302025-10-02T09:30:11+5:30
मुख्यमंत्री जाहिराती करण्यात मग्न आहेत. एक उपमुख्यमंत्री पाकिटावर आपले फोटो लावण्यात मग्न, तर दुसरे उपमुख्यमंत्री कुठेही नाहीत, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

माणसांच्या पदानुसार शब्दही बदलतात का? ठाकरेंचा सवाल; ओला दुष्काळ जाहीर करा!
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओला दुष्काळ नियमात बसत नसल्याचे सांगत आहेत. मात्र, २०२० मध्ये विरोधी पक्षनेते असताना ओला दुष्काळ जाहीर करण्याची तसेच शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली होती, असा दाखल देत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्त, शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. माणसाकडे पद आले की त्यानुसार त्याचे शब्दही बदलतात का, असा टोलाही त्यांनी लगावला.
पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिटन ५ रुपये आणि मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी १० रुपये असे टनामागे १५ रुपये कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला. शेतकऱ्यांचाच खिसा कापून त्यांनाच मदत करण्याचा हा प्रकार आहे. साखर संघानेदेखील या निर्णयाला विरोध केला आहे. शेतकरी अतिशय उद्विग्न झाले असून आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत. परंतु, मुख्यमंत्री जाहिराती करण्यात मग्न आहेत. एक उपमुख्यमंत्री पाकिटावर आपले फोटो लावण्यात मग्न, तर दुसरे उपमुख्यमंत्री कुठेही नाहीत, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
भाजपत आल्यावरच मिळेल कर्जमुक्ती?
भाजपमध्ये गेलेल्या काही साखरसम्राटांच्या कर्जाची परतफेड सरकार करणार आहे. साखरसम्राटांना भाजप सरकारने कर्जमाफी दिली. पीक नष्ट झाल्याने शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबले आहेत. जमीन, मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शेतकरी भाजपमध्ये गेल्यानंतरच त्यांना कर्जमुक्त करणार का? भाजप त्यासाठीच थांबला आहे का? असा सवाल ठाकरेंनी केला.
पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधा
केंद्राचे पथक अजूनही राज्यात आलेले नाही. नुकसानीची पाहणी होणार कधी? पंचनामे होणार कधी? तोपर्यंत शेतकऱ्यांनी काय करायचे? घरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्याची मागणीही ठाकरे यांनी केली.
कागदी घोडे नाचवू नका
पूरग्रस्त भागातील शाळा तत्काळ सुरू करा. रस्ते वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा येत आहेत. बी-बियाणे कोण उपलब्ध करणार? शेतकरी पुढच्या हंगामाची तयारी कशी करणार? असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे नियमांचे कागदी घोडे नाचवू नका. तातडीने लक्ष देऊन संकटात असलेल्या महाराष्ट्रासाठी तरी दिल्ली गाठा, असे ठाकरे म्हणाले.