HMPVचे टेन्शन नको, दक्षता घ्या; आरोग्य विभागाकडून लवकरच मार्गदर्शक सूचना जारी होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 07:43 IST2025-01-07T07:40:28+5:302025-01-07T07:43:13+5:30

मेटान्यूमोव्हायरसमुळे तीव्र श्वसन संसर्ग होतो. हा एक सामान्य विषाणू आहे.

Do not be nervous about HMPV be careful Health Department will issue guidelines soon | HMPVचे टेन्शन नको, दक्षता घ्या; आरोग्य विभागाकडून लवकरच मार्गदर्शक सूचना जारी होणार!

HMPVचे टेन्शन नको, दक्षता घ्या; आरोग्य विभागाकडून लवकरच मार्गदर्शक सूचना जारी होणार!

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सध्या चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमोव्हायरसने (एचएमपीव्ही)  थैमान घातले आहे. महाराष्ट्राशेजारील दोन राज्यांत त्याचे तीन रुग्ण सापडले आहेत. त्याबद्दल समाज माध्यमांवरून व्हायरल होणाऱ्या पोस्टमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे; मात्र महाराष्ट्रात या विषाणूचा एकही रुग्ण आढळला नसल्याने नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. तसेच, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. राज्य आरोग्य विभागाकडून लवकरच मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मेटान्यूमोव्हायरसमुळे तीव्र श्वसन संसर्ग होतो. हा एक सामान्य विषाणू आहे. त्याचा संसर्ग श्वसनमार्गाला होऊन सर्दीसदृश आजार होतो. हा एक हंगामी रोग आहे. तो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या प्रारंभीला फैलावतो.  या अनुषंगाने आरोग्य सेवा महासंचालनालय (डीजीएचएस) आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या (एनसीडीसी, दिल्ली) संचालकांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.

भीती कशाला ?

नेदरलँड्समध्ये २००१ मध्ये हा विषाणू सापडला होता. आता चीनमधून येणाऱ्या या विषाणू संसर्गाच्या बातम्यांवरून चिंतेचे कारण नाही. या विषाणूबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात येत आहे. नाहक भीती निर्माण करण्याची गरज नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसन संसर्ग रुग्णांच्या आकडेवारीचा आढावा घेतला आहे. श्वसन संसर्गाच्या रुग्णांमध्ये २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पालिका सज्ज

मुंबई शहर आणि उपनगरात एचएमपीव्ही  बाधित रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. तथापि, नागरिकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

हे करा-

 खोकला किंवा शिंका येत असतील तर तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून घ्या. 
 हात साबण लावून स्वच्छ करा किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरचा वापर करा. 
 ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर रहा. 
 भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्नपदार्थ खा. 
 संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायूविजन (व्हेंटिलेशन) होईल, याची दक्षता घ्या. 

हे करू नका-

 हस्तांदोलन 
 टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर  
 रुग्णांशी जवळून संपर्क 
 डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श 
 सार्वजनिक ठिकाणी थुंकणे 
 डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचे सेवन  

मार्गदर्शक सूचना लवकरच

नागरिकांनी घाबरून जाऊ नये. राज्य आरोग्य विभागाकडून लवकरच मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

चीनमधून आलेल्या या नव्या विषाणूंबाबत चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भीतीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. तथापि, सर्वेक्षणाला गती देऊन सर्दी- खोकला (आयएलआय) आणि सारी रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
- डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक, आरोग्य सेवा

Web Title: Do not be nervous about HMPV be careful Health Department will issue guidelines soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.