Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 16:21 IST2025-10-21T16:19:12+5:302025-10-21T16:21:39+5:30
Beed News: बीड शहरात दिवाळीच्या संध्याकाळी फटाक्यामुळे झालेल्या एका दुर्घटनेने एका कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडले.

AI Image
दिवाळी हा आनंदाचा सण असला तरी, फटाक्यांमुळे होणारे अपघात यंदाही घडले. बीड शहरात दिवाळीच्या संध्याकाळी फटाक्यामुळे झालेल्या एका दुर्घटनेने एका कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडले. सोमवारी सायंकाळी फटाका हातात फुटल्याने एका सहा वर्षांच्या मुलाला आपल्या एका डोळ्याची दृष्टी गमवावी लागल्याची दुःखद घटना घडली आहे.
शहरातील नागोबा गल्ली परिसरात राहणारा हा सहा वर्षांचा मुलगा दिवाळीच्या सोमवारी संध्याकाळी फटाके पेटवत होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने पेटवलेला एक फटाका विझल्याचे समजून त्याने दुसऱ्यांदा तो फटाका पेटवण्याचा प्रयत्न केला. त्याने फटाका हातात घेताच तो फुटला. या घटनेत मुलाच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु, त्याला पुढील उपचारांसाठी एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी मंगळवारी या दुर्घटनेची माहिती दिली. डॉक्टरांनी सांगितले की, "फटाका हातात फुटल्याने मुलाचा कॉर्निया पूर्णपणे खराब झाला असून त्याने एका डोळ्याची दृष्टी पूर्णपणे गमावली आहे." या दुःखद घटनेनंतर डॉक्टरांनी पालकांना कळकळीचे आवाहन केले आहे की, मुलांनी फटाक्यांसोबत खेळताना पालकांनी अत्यंत काळजी घ्यावी आणि लक्ष द्यावे, जेणेकरून असे गंभीर अपघात टाळता येतील.
फटाके फोडताना लहान मुलांशी 'अशी' काळजी घ्या
- मुलांनी फटाके नेहमी मोठ्या व्यक्तींच्या, विशेषतः पालकांच्या किंवा जबाबदार प्रौढांच्या देखरेखीखालीच फोडावेत. त्यांना कधीही एकटे सोडू नका.
- मुलांना जास्त आवाज किंवा धोकादायक ठरू शकणारे फटाके देऊ नका. फुलबाजे, भुईचक्र किंवा छोटी अनार यांसारखे कमी धोकादायक फटाके निवडणे सुरक्षित असते.
- फटाके पेटवण्यासाठी लांब मेणबत्ती किंवा लांब फुलबाजेचा वापर करा. मुलांना काडीपेटी किंवा लायटरने फटाके पेटवू देऊ नका.
- जो फटाका पहिल्या प्रयत्नात जळला नाही, त्याला हात लावू नका किंवा पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नका, तो फटाका पाणी टाकून विझवा.
- मुलांना फटाके फोडताना नायलॉन, पॉलिस्टर किंवा सिंथेटिक कपडे घालू देऊ नका. या कपड्यांना आग लवकर लागते. सुती कपडे अधिक सुरक्षित असतात.
- मुलांना फटाके फोडताना शूज किंवा चप्पल घालायला सांगा, जेणेकरून पायाला इजा होणार नाही.