मविआत खटके ! विधानसभेतील पराभवानंतर दरी वाढली, महाआघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 06:04 IST2025-01-11T06:02:49+5:302025-01-11T06:04:25+5:30

तीनही पक्षांच्या नेत्यांची एकमेकांवर चिखलफेक

Dispute in Mahavikas Aghadi! Gap widens after defeat in the assembly, question mark over future | मविआत खटके ! विधानसभेतील पराभवानंतर दरी वाढली, महाआघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह

मविआत खटके ! विधानसभेतील पराभवानंतर दरी वाढली, महाआघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने वाद विकोपाला जाऊन काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीत बिघाडी निर्माण झाली असतानाच, आता राज्यातील महाविकास आघाडीतही वादाची ठिणगी पडली आहे. ‘मविआ’तील तीनही पक्षांतील नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक सुरू केल्याने विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर निर्माण झालेली दरी वाढत असल्याचे चित्र आहे. यामुळे आघाडीच्या भवितव्यावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शरद पवार गट : ठाकरे गट झोपलेला, काँग्रेस मोडलेली पाठ

ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही. काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही, अशी टीका करत आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत. सध्या विरोधी पक्षात मोठी जागा शिल्लक आहे, त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे, असे विधान शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गुरुवारी पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत केले.

काँग्रेस : तुम्ही पक्षाकडे लक्ष द्या

त्याला उत्तर देताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, या सरकारने ईव्हीएमच्या भरवशावर सत्ता मिळवलेली आहे. त्यामुळे अमोल कोल्हेंनी आपल्या पक्षाकडे थोडे अधिक लक्ष द्यावे आणि आम्हाला सल्ला कमी द्यावा. जागावाटपाचा तिढा जर दोन दिवसांत संपला असता, तर प्रचारासाठी आणि नियोजनासाठी आम्हांला १८ दिवस मिळाले असते. त्यामुळे जागावाटपाचा घोळ आणि घालवलेला वेळ हे पराभवाचे मुख्य कारण आहे. 

काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आजही ऊर्मी आहे. आजही ते पक्ष उभा करू शकतात, ही ताकद आहे. त्यामुळे कोण काय बोलते याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे सांगत काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी अमोल कोल्हेंना लक्ष्य केले.

उद्धवसेना : दोघांनीच  आत्मचिंतन करावे

उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अमोल कोल्हे आणि वडेट्टीवार या दोघांच्या वक्तव्याचा समाचार घेत निशाणा साधला आहे. जागावाटपाच्या चर्चेत वडेट्टीवार होतेच. विदर्भातील काही जागा वडेट्टीवारांनी राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला सोडल्या असत्या तर बरे झाले असते. त्या जागा ते हरलेले आहेत. काही लोकांना असे वाटत होते, आता फक्त आम्हीच जिंकू, आम्हाला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत, देशातील वातावरण बदललेले आहे वगैरे वगैरे, असा टोला राऊत यांनी काँग्रेसला लगावला. कोल्हेंना ठाकरे गटावर टीका करण्याचा काय अधिकार आहे? तुम्ही स्वतः आत्मचिंतन करा, असा सल्ला उद्धवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.

तर अमोल कोल्हे मोठे नेते आहेत, विचारवंत आहेत. त्यांच्या पक्षाची काय स्थिती आहे ती सगळ्यांनी बघितली आहे, असा टोला उद्धवसेनेचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

एकीचे बळ...?

दुसरीकडे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा आहे. 
शरद पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटात सामील होऊन सत्तेची उब घ्यावी, अशी मागणी बैठकीत जाहीरपणे व्यक्त केल्याने भविष्यात ‘एकीचे बळ’ दिसणार का, याबाबत उलटसुलट चर्चा आहे.

Web Title: Dispute in Mahavikas Aghadi! Gap widens after defeat in the assembly, question mark over future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.