शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:36 IST2025-08-12T12:35:36+5:302025-08-12T12:36:24+5:30

सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची धावपळ उडाली. यावेळी वाद झालेल्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना शिवीगाळ देखील केली. 

Dispute at Eknath Shinde Shiv Sena meeting, fight between Ahilyanagar office bearers in Nashik | शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ

शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ

नाशिक - शहरातील हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये शिंदेसेनेच्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. सायंकाळी चार वाजता अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा पार पडल्यानंतर दोन गट आपापसांत भिडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे गोंधळ उडाला.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केला. यानंतर शिंदेसेनेचे अहिल्यानगरचे शहरप्रमुख सचिन जाधव आणि बाबूशेठ टायरवाले यांच्यात वाद झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. सुरक्षा रक्षक व पोलिसांच्या मदतीने वाद मिटविण्यात आला. सोमवारी नाशिक येथे धुळे, नंदुरबार जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दादा भुसे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अन्य मुख्य पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. 

बैठक आटोपल्यावर तेथेच वादावादी सुरू झाली. त्यात दोन, तीन पदाधिकारी बाहेर पडले. ज्यांच्यात वाद झाला तेही एकमेकांवर तोंडसुख घेत बाहेर पडले अन् बाहेर लॉन्समध्ये एकमेकांची कॉलर पकडण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. आतमधून मंत्री उदय सामंत यांनी गोंधळ घालणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हॉटेलच्या बाहेर जाण्याचा निरोप पाठवला. तेव्हा सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची धावपळ उडाली. यावेळी वाद झालेल्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना शिवीगाळ देखील केली. 

दरम्यान, शरद पवार गटाचा कोणताही कार्यकर्ता बैठकीत शिरला नव्हता. अहिल्यानगर येथील आमच्याच पदाधिकाऱ्यात किरकोळ वाद झाला. मात्र पक्ष याची योग्य दखल घेणार असून, वादाचा व्हिडिओ तपासून संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता...

बाबूशेठ टायरवाले यांनी कर्जत तालुक्यातील एका ठेकेदाराला बैठकीत आणले होते. तो ठेकेदार राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. त्याने राहुरीचा निधी कर्जतसाठी पळवला. कर्जत तालुकाध्यक्षांनीच सदर ठेकेदार बैठकीत बसवल्याची आम्हाला माहिती दिली. त्यामुळे शिंदेसेनेच्या बैठकीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सोबत आणला कसा? असा जाब आम्ही टायरवाले यांना विचारला, त्यावेळी थोडा गोंधळ झाला अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव यांनी दिली.  

Web Title: Dispute at Eknath Shinde Shiv Sena meeting, fight between Ahilyanagar office bearers in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.