दिशा सालियन प्रकरण: नारायण राणेंच्या गंभीर आरोपांवर आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 20:13 IST2025-03-22T20:13:19+5:302025-03-22T20:13:54+5:30
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणामुळे शिवसेना नेते आदित्य ठाकरे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

दिशा सालियन प्रकरण: नारायण राणेंच्या गंभीर आरोपांवर आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, म्हणाले...
Disha Salian Case : बहुचर्चित दिशा सालियन प्रकरणामुळे शिवसेना नेते आदित्य ठाकरे अडचणीत आले आहेत. दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यात दिशावर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता ठाकरेंनी राणेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
मीडियाशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 'त्यांना द्यायचे माझे काम नाही. त्यांना पगारच इतरांवर घाण आरोप करायचा मिळतो. आपण आधी पाहिले असेल, माझ्या परिवारावर, वडिलांवर, पक्षावर आरोप केले होते. त्यांना पक्ष सोडून किती वर्ष झाली, मात्र त्यांच्या मनातून आम्ही काय उतरत नाही. बोलू द्या त्यांना. पक्ष सोडल्यापासून ते आमच्यावर टीका करतात. पण कचऱ्यावर आपण लक्ष देत नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
नारायण राणेंनी म्हटले ?
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊ नये अशी विनंती करणारे उद्धव ठाकरे यांचे आपल्याला दोन फोन आले होते असा दावा खासदार नारायण राणे यांनी केला. राणे म्हणाले की, ही जी घटना घडली होती त्यावेळी एक फोन आला. मिलिंद नार्वेकरांनी सांगितले की उद्धव ठाकरेंना बोलायचे आहे. आदित्यचे नाव घेता त्याचा उल्लेख करू नये, अशी विनंती त्यांनी केली होती. मी म्हणालो, एका निरपराध मुलीची हत्या केली गेली, त्यामध्ये आरोपींना शिक्षा मिळावी, असे आमचे मत आहे. संध्याकाळी तुमची मुले कुठे जातात, त्याची काळजी घ्या. जुहूला माझ्या घराजवळ दिनो मोरिया राहतो, हे काय धुमाकूळ घालतात मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही त्याला सांभाळा असं मी बोललो. त्यावर ते म्हणाले की, तशी काळजी घेतो पण तुम्ही सहकार्य करा, असा गौप्यस्फोट राणेंनी केला आहे.