Discussions were held with Pawar on the establishment of government says devendra fadnavis | सत्तास्थापना, खातेवाटपाची पवारांशी झाली होती चर्चा, देवेंद्र फडणवीस यांनी केला दावा

सत्तास्थापना, खातेवाटपाची पवारांशी झाली होती चर्चा, देवेंद्र फडणवीस यांनी केला दावा


नागपूर : नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्यात सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसनेच भाजपकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यावेळी भाजपची चर्चा अजित पवार नव्हे, तर थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीच झाली होती. अगदी खातेवाटपाची बोलणी अंतिम झाली होती, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागपुरात एका कार्यक्रमात फेसबुकच्या माध्यमातून ते बोलत होते.

नोव्हेंबर २०१९ मध्ये जे काही घडले ते मी का केले असे अनेकदा प्रश्न उपस्थित होतात. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आमची शिवसेनेशी बोलणी सुरू होती. मात्र त्यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाण्याचे ठरविले असल्याचे आम्हाला कळाले. त्यानंतर १० ते १२ दिवस आम्ही विविध पर्यायांवर विचार केला व राष्ट्रवादीशी बोलणी केली. सरकार स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडूनच आला होता. आमची बोलणीदेखील अंतिम झाली होती. सरकार बनविण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण केली. खातेवाटप, जिल्ह्यांचे पालकमंत्रीदेखील निश्चित केले. ही सगळी चर्चा शरद पवारांसोबतच झाली होती. राज्यात राष्ट्रपती शासन लागले व त्यासाठी दिलेले पत्रदेखील मीच ‘ड्राफ्ट’ केले होते, असे ते म्हणाले

ती ‘लिंक’ हटविली
- फडणवीस यांच्या या कार्यक्रमाचे ‘फेसबुक’वर ‘लाईव्ह’ सुरू होते. या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांचे कॅमेरे नाहीत म्हणून मी दिलखुलासपणे बोलू शकतो असे फडणवीस म्हणाले. 
- शरद पवारांबाबत त्यांनी वक्तव्य केल्यानंतर काही वेळातच ‘फेसबुक लाईव्ह’च बंद झाले. याशिवाय ‘फेसबुक लाईव्ह’ची ‘लिंक’देखील हटविण्यात आली. अशाप्रकारे ‘लिंक’ हटविण्याचे गुपित काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Discussions were held with Pawar on the establishment of government says devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.