उकाड्याचे होणार विसर्जन; वादळी वाऱ्यांसह पाऊस पुनरागमन करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 13:08 IST2022-09-08T13:07:17+5:302022-09-08T13:08:46+5:30
गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला आहे.

उकाड्याचे होणार विसर्जन; वादळी वाऱ्यांसह पाऊस पुनरागमन करणार
मुंबई: मुंबईसह राज्यभरात दडी मारून बसलेला वरुणराजा आता आणखी सक्रिय झाला असून, हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार ८ ते ११ सप्टेंबरदरम्यान राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर अन्य ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल आणि किनारपट्टीवर सोसाट्याच्या वाऱ्यासह झोडपधारा कोसळतील. दरम्यान, शुक्रवारी ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबईला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. ८ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढेल. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.
- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग
गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला आहे.
पावसाचा अंदाज -
- ८ सप्टेंबर : सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ढगांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांत विजांचा कडकडाट होईल.
- ९ सप्टेंंबर : रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
- १० सप्टेंबर : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, लातूर, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
- ११ सप्टेंबर : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.