एसटीचे डिझेलचे दीड कोटींचे पेमेंट गेले कामगारांच्या पगार खात्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 18:21 IST2021-06-23T18:21:09+5:302021-06-23T18:21:59+5:30
एसटी प्रशासनाची एकच धावपळ.

एसटीचे डिझेलचे दीड कोटींचे पेमेंट गेले कामगारांच्या पगार खात्यात
नरेश पवार
वडखळ : एसटीच्या रायगड विभागीय कार्यालयांमध्ये डिझेल करिता ठेवलेले दीड कोटी रुपये शेकडो कर्मचाऱ्यांच्या पगाराकरीता वापरल्याची धक्कादायक घटना रामवाडी, पेण येथील विभागीय कार्यालयातून आज घडली. मात्र चूक लक्षात येताच काही कालावधीत ही रक्कम परत घेण्यात आल्याने डिझेल अभावी एसटीचा चक्का जाम होण्याची मोठी नामुष्की टळली.
एसटीचे रायगड विभागीय कार्यालय पेण येथे असून या कार्यालयातील अकाउंट डिपार्टमेंटने एसटीला रोज लागणाऱ्या डिझेल करिता ठेवलेले सुमारे दीड कोटी रुपये डिझेलसाठी न वापरता शेकडो कामगारांच्या पगारासाठी वापरण्यात आले. मात्र काही वेळातच लेखा शाखेतील अधिकाऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट येताच ऑनलाईन केलेले पगार परत घेण्यासाठी अधिकाऱ्यांची एकच धावपळ झाली.
लेखा शाखेतील अधिकारी, स्वतः विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी संबंधित बँकांशी संपर्क साधून सदरची रक्कम परत मागवून घेतल्याने डिझेल अभावी एस. टी. बंद होण्याचा धोका टळला खरा, परंतु अधिकाऱ्यांची बेपर्वाई समोर आली आहे.
रायगड जिल्ह्यातील एसटी महामंडळाला रोजचे लागणाऱ्या डिझेलचे ऑनलाईन पेमेंट करताना चुकून कामगारांच्या पगारात ही रक्कम गेली. मात्र काही वेळातच लेखाधिकारी यांच्या ही चूक लक्षात आल्याने तात्काळ हे पेमेंट परत घेण्यात आले आहे. यामध्ये कोणताही घोळ झालेला नाही. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल.
अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक रायगड