SSC Exam: दहावीचा मराठीचा पेपर खरंच फुटला?; राज्य शिक्षण मंडळाने दिलं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 09:00 IST2025-02-22T09:00:29+5:302025-02-22T09:00:59+5:30
राज्य शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून पेपरफुटी झाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

SSC Exam: दहावीचा मराठीचा पेपर खरंच फुटला?; राज्य शिक्षण मंडळाने दिलं स्पष्टीकरण
SSC Exam 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणारी इयत्ता १० वीची परीक्षा कालपासून सुरू झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी जालना जिल्ह्यात मराठीचा पेपर फुटल्याची चर्चा सुरू झाल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून पेपरफुटी झाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
सकाळ सत्रात मराठी भाषेचे पेपर होते, या पेपरच्या वेळी जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद हायस्कूल, बदनापूर ता. बदनापूर जि. जालना येथील परीक्षा केंद्र कमांक ३०५० या केंद्रावर मराठी प्रथम भाषेचा पेपर फुटला असल्याबाबत व यवतमाळ जिल्ह्यातील महागाव व कोठारी या परीक्षा केंद्रांवर मराठी प्रथम भाषा विषयाची प्रश्नपत्रिका मोबाईलद्वारे व्हायरल झाल्याबाबत, तसेच जिल्हा परिषद प्रशाला, तळणी, ता.मंठा, जि.जालना, केंद्र क्रमांक ३४३६ या परीक्षा केंद्रासंदर्भात काही माध्यमांमधून बातम्या प्रसारित झालेल्या आहेत.
स्पष्टीकरण देताना राज्य शिक्षण मंडळाने कोणते दावे केले?
१) जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद हायस्कूल, बदनापूर, ता. बदनापूर, जि. जालना येथील परीक्षा केंद्र क्रमांक ३०५० या केंद्रावर पेपर फुटीच्या बातमी संदर्भात सदर केंद्रावर भेट दिली असता जी दोन पाने काही वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झालेली आहेत त्याअनुषंगाने मराठी (प्रथम भाषा) विषयाच्या मूळ प्रश्नपत्रिकेची छाननी केली असता सदरची दोन पाने ही मूळ प्रश्नपत्रिकेची नसून अन्य खासगी प्रकाशकाने प्रकाशित केलेली दिसून आली तसेच काही हस्तलिखित मजकूराची पानेही आढळून आली, त्यामध्ये प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न व त्या प्रश्नांची उत्तरे हस्तलिखितामध्ये आढळून आलेली आहेत. म्हणजे ही प्रश्नपत्रिका फुटलेली नसून गैरमार्ग करण्याच्या दृष्टीने प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न व उत्तरे व्हायरल केल्याचे दिसून येते. संबंधित घटनेची गांभीर्याने नोंद घेऊन जिल्हा प्रशासनाने याबाबत सविस्तर चौकशी करून त्याचा अहवाल देण्याबाबत व दोषी असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.
२) यवतमाळ जिल्ह्यातील महागाव कोठारी या परीक्षा केंद्रांवर मराठी (प्रथम भाषा) विषयाची प्रश्नपत्रिका मोबाईलद्वारे व्हायरल झाली अशा पद्धतीच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्या आहेत. याबाबत संबंधितांकडून सदर घटनेचा सविस्तर अहवाल घेण्यात आला असून संबंधित केंद्रावर प्रश्नपत्रिका फुटलेली नसून गैरमार्ग करण्याच्या दृष्टीने प्रश्नपत्रिका व्हायरल केल्याचे दिसून येते. सदर प्रकरणात दोषी व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
३) जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्रशाला, तळणी, ता. मंठा, जि.जालना, केंद्र कमांक ३४३६ या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालकांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती, पोलिसांच्या मदतीने पालकांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी बाहेर काढण्यात आले सदर परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी स्पष्ट केले आहे.