'इंडिया आघाडी जमिनीत गडप झाली की हवेत विरून गेली?'; संजय राऊतांचा चढला पारा, काँग्रेसला अनेक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 10:39 IST2025-04-12T10:35:14+5:302025-04-12T10:39:10+5:30

खासदार संजय राऊतांनी वेगवेगळ्या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरले. मागील काळात काँग्रेसने घेतलेल्या भूमिकांवरून राऊतांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

'Did the India Alliance collapse into the ground or disappear into thin air?'; Sanjay Raut's temper flares, many questions for Congress | 'इंडिया आघाडी जमिनीत गडप झाली की हवेत विरून गेली?'; संजय राऊतांचा चढला पारा, काँग्रेसला अनेक सवाल

'इंडिया आघाडी जमिनीत गडप झाली की हवेत विरून गेली?'; संजय राऊतांचा चढला पारा, काँग्रेसला अनेक सवाल

Sanjay Raut Congress: 'महाराष्ट्रात काँग्रेस मित्रपक्षांशी ज्या पद्धतीने वागली त्याचा निकाल विधानसभेत दिसला. आपल्याला मोदी-शहांच्या भाजपला हरवायचे आहे, आपल्याच गोतावळ्यातील मित्रांना नाही', अशा शब्दात शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. अलिकडेच काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन गुजरातमध्ये पार पडले. या अधिवेशानातील मुद्द्यावर आणि भूमिकांवर बोट ठेवत राऊतांनी  काँग्रेसच्या डोळ्यात अंजन घातले.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

संजय राऊतांनी काँग्रेसच्या अधिवेशनाबद्दल एका लेखातून भाष्य केले आहे. राऊत म्हटलं आहे की, 'काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन मोदी-शाह यांच्या गुजरातमध्ये संपन्न झाले. अहमदाबादमध्ये काँग्रेसने अधिवेशन घेतले व राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा केली याला विशेष महत्त्व आहे. एरवी विरोधकांचा आवाज दडपण्याची एकही संधी न सोडणाऱ्या मोदी-शहांना गुजरातच्या भूमीवरून त्यांच्यावर झालेले हल्ले सहन करावे लागले. ‘घुसकर मारेंगे’ हा भाजपवाल्यांचा आवडता शब्दप्रयोग आहे. राहुल गांधी यांनी अहमदाबादेत घुसून मारले असेच म्हणावे लागेल."

वाचा >ईडीला अधिकार आहेत तसे लोकांनाही आहेत, त्यांचाही विचार करा, सर्वोच्च न्यायालयाने झापले

"मोदी-शाहांना त्यांच्याच जमिनीवर जाऊन आव्हान देण्याचा हा प्रयत्न चांगला आहे, पण त्यामुळे भारतात खरेच राजकीय क्रांती होईल काय?", असा सवाल राऊतांनी काँग्रेसला केला आहे. 

विधानसभेतील अपयशाला काँग्रेसही जबाबदार

राऊतांनी पुढे म्हटलं आहे की, "2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने शंभर जागा जिंकल्या. इंडिया आघाडीने मोदींना 240 वर रोखले, पण इंडिया आघाडीला सत्ता मिळवता आली नाही. ज्या गुजरातच्या भूमीवरून काँग्रेसने मोदींना आव्हान दिले, त्या राज्यात काँग्रेस लोकसभेची एकही जागा जिंकू शकली नाही. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातही काँग्रेसला मेहनत घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रात लोकसभेत यश मिळाले, पण विधानसभेत मोठे अपयश पदरी पडले. त्यास भाजपचे घोटाळे जितके कारणीभूत आहेत, तेवढेच काँग्रेसअंतर्गत काही विषय जबाबदार आहेत. त्यावर मंथन झाले पाहिजे", असे खडेबोल राऊतांनी काँग्रेसला सुनावले आहेत. 

इंडिया आघाडीवरून संजय राऊतांचे सवाल

"लोकसभेच्या निकालानंतर ‘इंडिया आघाडी कोठे आहे?’ असे प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांना काँग्रेसने गुजरातच्या अधिवेशनातून उत्तर देणे गरजेचे होते. इंडिया आघाडीचे काय झाले? ती जमिनीत गडप झाली की हवेत विरून गेली? नक्की काय झाले? याचे उत्तर देण्याची जबाबदारी काँग्रेस अध्यक्षांवर आहे", असे म्हणत राऊतांनी काँग्रेसला घेरले. 

"काँग्रेसने स्वतःला मजबूत करायला हवे, पण भारतीय जनता पक्ष स्वतःला मजबूत करताना आपल्याच मित्रपक्षांचा, प्रादेशिक पक्षांचा घास गिळतो. अर्थात आजचे मोदींचे सरकार हे शेवटी प्रादेशिक पक्षांच्या कुबड्यांवरच टिकले आहे याकडे काँग्रेसने डोळसपणे पाहायला हवे. गुजरातच्या अधिवेशनात काँग्रेसने स्वतःपुरता विचार केला व भूमिकांची मांडणी केली. त्यात ‘इंडिया’ किंवा ‘भारत’ दिसत नाही. हुकूमशाहीविरुद्ध लढण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे व त्यासाठी काँग्रेसलाच पुढे यावे लागेल", अशी भूमिका राऊत यांनी मांडली आहे. 

तृणमूल सोबत आघाडीवरून काँग्रेसला सवाल

"दिल्लीत केजरीवाल यांच्या पराभवानंतर काँग्रेससाठी मैदान मोकळे झाले असे त्यांच्या नेत्यांना वाटणे स्वाभाविक आहे. अनेक राज्यांत मैदान मोकळे करण्याचे तंत्र ते अवलंबणार असतील तर मोदी-शाहांची ते सेवा करीत आहेत असेच म्हणायला हवे. बिहार, गुजरात, प. बंगालच्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेस काय भूमिका घेणार आहे? की पुन्हा एकदा पराभवाचेच दिलखुलास स्वागत करणार?", असा सवाल राऊतांनी केला आहे. 

राऊत म्हणाले, रणशिंग फुंकले, पुढे काय?

"महाराष्ट्रात काँग्रेस मित्रपक्षांशी ज्या पद्धतीने वागली त्याचा निकाल विधानसभेत दिसला. आपल्याला मोदी-शहांच्या भाजपला हरवायचे आहे, आपल्याच गोतावळ्यातील मित्रांना नाही. काँग्रेसने आपल्या जुन्या वाड्याचे नेपथ्य लावून भाषणे केली. वाडा लयास गेला आहे. तो उभारण्याची ताकद निर्माण करावी लागेल. जुन्या काळातून बाहेर पडून नवा विचार द्यावा लागेल. गुजरातच्या भूमीवरून काँग्रेसने रणशिंग फुंकले, पण पुढे काय?", असे म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसच्या डोळ्यात अंजन घातले आहे. 

Web Title: 'Did the India Alliance collapse into the ground or disappear into thin air?'; Sanjay Raut's temper flares, many questions for Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.