माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 21:31 IST2024-09-26T21:30:39+5:302024-09-26T21:31:15+5:30
'गेल्या 60 वर्षात जे होऊ शकले नाही, ते आम्ही 10 वर्षात केले आहे आणि 2047 पर्यंत भारत एक विकसित देश म्हणून उदयास येईल.'

माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
Nitin Gadkari : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे सर्व क्षेत्रातील लोकांची जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राजकारण असो, व्यवसाय असो किंवा कला क्षेत्र असो...ते सर्व क्षेत्रातील लोकांशी नेहमी आपुलकीने संवाद साधतात. विशेष म्हणजे, गडकरी अनेकदा सार्वजनिक मंचावरुन आपल्या आयुष्यातील वेगवेगळे किस्सेही सांगतात असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी एक असा किस्सा सांगितला आहे, ज्यामुळे दिग्गज उद्योगपती रतन टाटा आणि धीरुभाई अंबानीदेखील चकीत झाले होते.
शेअर बाजारातून 1200 कोटी रुपये उभे केले
नितीन गडकरी इंडिया टूडेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा केली. एक किस्सा सांगताना ते म्हणाले की, मला मुंबई वरळी उड्डाणपुलासाठी आणखी पैशांची गरज होती, तेव्हा मी बाजारातून 1200 कोटी रुपये उभे केले होते. हे पाहून रतन टाटा आणि धीरूभाई अंबानीदेखील आश्चर्यचकित झाले होते. धीरूभाई अंबानी मला म्हणाले होते की, तू आमच्यापेक्षाही हुशार आहेस.
रस्त्यांवरील खड्डे संपतील
नितीन गडकरी पुढे म्हणाले की, आज ठिकठिकाणी समस्या आहेत, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. पाऊस पडल्यानंतर खड्डे दिसतात. अतिवृष्टीमुळे चांगला रस्ताही वाहून जातो. रस्त्यांवर खड्डे होणार नाहीत याची काळजी घेणे, ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही नवीन तंत्रज्ञान आणत आहोत, ज्यामुळे महामार्ग आणि इतर रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत. या तंत्रज्ञानाअंतर्गत आठ इंचांपर्यंत काँक्रीट टाकण्यात येणार असून, त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली.
राजकारणातील कटुता वाढल्याच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, कोणत्याही पक्षाचे नेते माझ्याकडे आले की, मी विभागाला सांगतो की, सर्वांची कामे झाली पाहिजेत. राजकारणात मतं वेगळी असू शकतात, पण सर्वांशी संबंध चांगले असले पाहिजेत. भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आम्ही चांगले काम केले आहे. गेल्या 60 वर्षात जे होऊ शकले नाही, ते आम्ही 10 वर्षात केले आहे आणि 2047 पर्यंत भारत एक विकसित देश म्हणून उदयास येईल, असे मी आत्मविश्वासाने सांगत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.