पाच दिवसात ‘धवललक्ष्मी’ ने कापले ४५ किमी अंतर; सॅटेलाइट टॅगद्वारे कासवाचा अभ्यासकांकडून मागोवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 07:24 IST2025-11-27T07:23:57+5:302025-11-27T07:24:17+5:30
डहाणूच्या सागरी कासव संक्रमण व उपचार केंद्रात तीन महिने वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर या कासवाच्या पाठीला सॅटेलाईट टॅग लावण्यात आले.

पाच दिवसात ‘धवललक्ष्मी’ ने कापले ४५ किमी अंतर; सॅटेलाइट टॅगद्वारे कासवाचा अभ्यासकांकडून मागोवा
अनिरुद्ध पाटील
बोर्डी : सॅटेलाईट टॅग लावलेले ‘धवललक्ष्मी’ या ऑलिव्ह रिडले मादी सागरी कासवाला गुरुवारी (दि. २०) डहाणूच्या समुद्रात सोडण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या सागरी जलविहाराची माहिती वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि कांदळवन विभागाकडून घेतली जात आहे. त्यानुसार २० ते २५ नोव्हेंबर या पाच दिवसात धवललक्ष्मीने तब्बल ४५ किमीचे अंतर कापले आहेत. हा समाधानकारक प्रवास असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
तीन महिने वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर प्रवास सुरू
डहाणूच्या सागरी कासव संक्रमण व उपचार केंद्रात तीन महिने वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर या कासवाच्या पाठीला सॅटेलाईट टॅग लावण्यात आले. २० नोव्हेंबरला दुपारी एकच्या सुमारास धाकटी डहाणू खाडीतून ६ नॉटीकल खोल समुद्रात मादी कासवाला सोडले होते. तिथून २५ किलोमीटर खोल समुद्रात या कासवाने प्रवास केल्याचे २१ नोव्हेंबरच्या सकाळी सॅटेलाइट सिग्नलद्वारे समजले. त्यानंतर २५ नोव्हेंबरला शेवटचा सिग्नल प्राप्त झाला. त्यानुसार मागील स्थळापासून २० किलोमीटर उत्तरेकडे पालघर-गुजरात सीमेलगत त्याचा वावर आढळला.
यापूर्वीही कासवावर असे प्रयोग केले होते
कासवाची नवीन त्वचा आल्यावर जुन्या त्वचेसह हे डिव्हाईस निघून जाते, त्यामुळे त्याच्या शरीरधर्मावर लावलेल्या टॅगचा कालावधी अवलंबून असतो. २०१०-११ला ओडिसा येथे कासवावर असे टॅग लावले, ते सुमारे दोन वर्षे चालले. त्या कासवाने बंगालची खाडी आणि श्रीलंकेच्या समुद्रात शिरकाव केला होता. २०२२-२३ ला गुहागर येथे असे टॅग लावलेल्या कासवाची तामिळनाडू, श्रीलंका या प्रवासाची नोंद झाली होती. वेलास येथील कासव कर्नाटक, केरळ, तसेच गुजरातच्या समुद्रात भटकंती करताना आढळले होते. विणी हंगामात किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या कासवांवर हा प्रयोग होता.
खुल्या समुद्रातील पुनर्वसन, जीवनक्रम कळणार
सॅटेलाइट टॅग लावलेले कासव श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागी आल्यानंतरच सिग्नल प्राप्त होतात. दिवसातून दोन ते तीन वेळाच हे सिग्नल मिळतात, त्यावेळी कासव पृष्ठभागावर नसल्यास मात्र हा योग जुळून यायची वाट पाहावी लागते, असे तज्ज्ञ सांगतात. जखमी कासवावरील उपचारानंतर बरे झाल्यावर हे टॅग लावण्यात आलेला देशातील पहिला प्रयोग आहे. उपचारानंतर कासवाचे खुल्या समुद्रातील पुनर्वसन, त्याचा जीवनक्रम, मार्गक्रमण केलेला भाग, अंतिम कालावधी, आदी माहिती प्राप्त होईल. या हाती घेतलेल्या उपक्रमाने कासवाच्या सागरी भ्रमंतीचा मागोवा अभ्यासासाठी होणार आहे.