"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 16:28 IST2025-08-06T16:27:27+5:302025-08-06T16:28:08+5:30

Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी नागपुरात "धर्म जागरण न्यास"च्या प्रांतीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी धर्माविषयी आपले विचार मांडले.

Dharm is truth, its practice helps people get courage, determination: Mohan Bhagwat | "कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत

"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी नागपुरात "धर्म जागरण न्यास"च्या प्रांतीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी धर्माविषयी आपले विचार मांडले. धर्म हा केवळ देवपूजेपुरता मर्यादित नसून, तो समाजाला एकत्र ठेवणारी आणि एकात्मतेला बळ देणारी शक्ती आहे. धर्मासाठी कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही, असे ते म्हणाले.

मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, "धर्मकार्य हे केवळ देवासाठी नसून, समाजाच्या हितासाठी आहे. धर्म योग्य असेल, तर समाजही योग्य दिशेने जाईल. समाजात शांतता नांदेल, संघर्ष निर्माण होणार नाही, आणि विषमता कमी होईल. खऱ्या अर्थाने धर्म समजून घेऊन समाजाने वाटचाल केली, तरच सकारात्मक बदल घडू शकतो. भारताचा इतिहास धर्मासाठी केलेल्या त्यागांनी भरलेला आहे, धर्मासाठी अनेकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले पण धर्म सोडला नाही."

भाषणात छावा चित्रपटाचा उल्लेख
"धर्म म्हणजे केवळ पूजा किंवा उपासना नसून, तो एक कर्तव्य आहे. मातृत्व धर्म, पितृत्व धर्म, पुत्र धर्म, मित्र धर्म, प्रजा धर्म आणि राजधर्म, हे सर्व धर्माचेच भाग आहेत. जो या धर्माचे पालन करतो, तोच खरा धार्मिक व्यक्ती आहे. आपल्या समाजातील सामान्य जनतेनेही धर्मासाठी मोठमोठे त्याग केले आहेत. छावा चित्रपटामध्ये दाखवलेले आदर्श हे आपल्या समाजाचेच प्रतिबिंब आहेत", असेही ते म्हणाले.

हा हिंदू धर्म नव्हे, तर मानव धर्म आहे
मोहन भागवत यांनी स्पष्टपणे सांगितले की, "हिंदू धर्म म्हणजे केवळ एका समाजाचा धर्म नसून तो प्रत्यक्षात मानव धर्म आहे, जो प्रथम हिंदूंनी ओळखला आणि आपल्या आचरणात आणला. आज जगभरात संघर्ष, पर्यावरणीय संकटे आणि सामाजिक विघटन यांचा सामना केला जात आहे, कारण विविधतेला कसे स्वीकारावे आणि हाताळावे हे अनेकांना ठाऊक नाही. आपल्या धर्माने हे आधीच करून दाखवले आहे, आणि आता जगाने हे शिकणे गरजेचे आहे."

धर्मामुळे सर्वांचे कल्याण शक्य
भागवत यांनी जोर दिला की, "भारताने असा आदर्श जगासमोर ठेवला पाहिजे, ज्यातून हे स्पष्ट होईल की, धर्मानुसार जीवन जगल्यास व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत सर्वांचे कल्याण शक्य आहे. धर्म समजण्यासाठी ग्रंथ किंवा तर्काची नव्हे, तर थेट आचरणाची आवश्यकता आहे. जेव्हा धर्म कृतीत उतरतो, तेव्हाच खरे धर्म जागरण घडते आणि त्यातूनच जग शिकू शकते,” असे ते म्हणाले.

Web Title: Dharm is truth, its practice helps people get courage, determination: Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.