मेगाभरतीला धनगर समाजाचा विरोध; आधी ‘एसटी’चे दाखले देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 19:01 IST2018-12-06T18:58:10+5:302018-12-06T19:01:02+5:30
आधी ‘एसटी’चे दाखले, मगच भरती; यशवंत सेनेचा इशारा

मेगाभरतीला धनगर समाजाचा विरोध; आधी ‘एसटी’चे दाखले देण्याची मागणी
मुंबई : राज्य शासनाने जाहीर केलेल्या ७२ हजार पदांच्या भरतीला आता धनगर समाजाने स्थगिती देण्याची मागणी केली आहे. आधी धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे दाखले द्या, त्यानंतर कोणत्याही प्रकारची भरती घ्या, असा इशारा यशवंत सेनेने राज्य सरकारला दिला आहे.
यशवंत सेनेचे अध्यक्ष माधव गडदे म्हणाले की, सत्तेवर येण्यापूर्वी विरोधी बाकावरील देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मराठा आरक्षण मंजूर होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती देण्यात आली होती. त्याचप्रमाणे मराठा समाजापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या धनगर समाजाची आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे दाखले मिळाल्यास सुमारे दीड कोटी समाज बांधवांना त्याचा फायदा होण्याची शक्यता गडदे यांनी व्यक्त केली आहे. परिणामी, मेगाभरतीला स्थगिती द्या, नाहीतर जिल्हानिहाय यशवंत सेनेकडून होणाऱ्या विरोधाला सरकार जबाबदार असेल, असा इशाराही गडदे यांनी दिला आहे.