माऊलींच्या समाधीवरील महापूजाबंदीला भाविकांचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 08:05 PM2020-02-11T20:05:26+5:302020-02-11T20:13:05+5:30

दैनंदिन अभिषेकाव्यतिरिक्त भाविकांकडून होणारे सर्व अभिषेक व महापूजा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय

Devotees object to Maha Puja ban on Sant dnyaneshwar maharaj | माऊलींच्या समाधीवरील महापूजाबंदीला भाविकांचा आक्षेप

माऊलींच्या समाधीवरील महापूजाबंदीला भाविकांचा आक्षेप

Next
ठळक मुद्देभाविक व पुजाऱ्यांचे जिल्हा न्यायाधीशांना लेखी निवेदन; देवस्थान निर्णयावर ठाम महापूजेदरम्यान भाविकांची गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी  अभिषेकावेळी मर्यादित लोकांपेक्षा असंख्य भाविकांची संजीवन समाधीच्या स्पर्शदर्शनासाठी गैरसोय

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत माऊलींच्या समाधीवर २७ डिसेंबर २०१९ पासून कमिटीच्या वतीने दैनंदिन होणाऱ्या पवमान अभिषेकाव्यतिरिक्त भाविकांकडून होणारे सर्व अभिषेक व महापूजा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटीने घेतला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात साडेचारशेहून अधिक भाविक तसेच पुजाºयांनी लेखी आक्षेप घेतला आहे. याविरोधात त्यांनी जिल्हा न्यायाधीश व विधी व न्यायमंत्र्यांकडे निवेदन दिले आहे. त्यामुळे पुढील निर्णय काय होईल; याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
  ज्ञानेश्वरमहाराजांची समाधी ही संजीवन असून, ती समाजाच्या चिरंतन श्रद्धेचा ठेवा असल्याने तिचे संवर्धन व जपणूक होणे हे सर्व भाविकांचे सार्वत्रिक व सामूहिक उत्तरदायित्व आहे. त्यामुळे समाधीची होणारी झीज तसेच  अभिषेकावेळी मर्यादित लोकांपेक्षा असंख्य भाविकांची संजीवन समाधीच्या स्पर्शदर्शनासाठी गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले. 
 माऊलींची संजीवन समाधी ही चिरंतन राहणे आवश्यक असल्यामुळे दररोज मोठ्या संख्येने होणाऱ्या अभिषेकांमुळे समाधीची झीज होत आहे का, याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन व त्यांचा अहवाल मागविण्यासाठी संस्थानने भारत सरकारचे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. यापार्श्वभूमीवर तज्ज्ञ समितीने प्रत्यक्ष मंदिरामध्ये येऊन संजीवन समाधीची पाहणी केली होती. समाधीवर होणाऱ्या अभिषेक व महापूजांमुळे समाधीची अधिक झीज होऊ शकते व त्यामुळे समाधीवरील दैनंदिन अभिषेकांची संख्या कमीतकमी राखली जावी असा अभिप्राय व निष्कर्ष तज्ज्ञांनी संस्थान कमिटीकडे सादर केला होता. 
 त्यानुसार माजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे यांच्याकडे कमिटीच्या विश्वस्तांनी सर्व विषय कथन करून घेतला होता. सदर विषयाचे सर्व पैलू जाणून घेतल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी संजीवन समाधीवरील महापूजा व अभिषेक नियंत्रित करण्याबाबत अनुकूलता दर्शविली. त्यामुळे भाविकांकडून होणारे सर्व अभिषेक व महापूजा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटीने घेऊन मुक्ताबाई मंडपात पर्यायी व्यवस्था कार्यान्वित केली आहे. 
  या निर्णयाला विरोध असेल, त्यांनी ३१ जानेवारीपर्यंत लेखी स्वरूपात तक्रार व सूचना करण्यास देवस्थानने मुदत दिली होती. सद्यस्थितीत या निर्णयाविरोधात साडेचारशेहून अधिक भाविक तसेच पुजाऱ्यांनी लेखी आक्षेप घेतलेला आहे.
......................
 माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी तसेच अभिषेक व महापूजा करण्यासाठी भाविकांची संख्या वाढत आहे. त्यातच महापूजेदरम्यान भाविकांची गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. यापार्श्वभूमीवर नवीन नियमाची अंमलबजावणी सुरू आहे. या निर्णयाचे भाविक, वारकरी व स्थानिक नागरिकांनी स्वागत करून अभिप्राय नोंदवला आहे. तर अनेकांनी दूरध्वनीवर संपर्क साधून निर्णयाचे स्वागत केले आहे. 
............
 चलपादुकांवर महापूजा व अभिषेक सुरू केल्यापासून तुलनात्मक पाहणी केली असता सकाळी सहा ते अकरा या वेळेत सरासरी ७८०० ते ८००० भाविकांचे दर्शन होत आहे. यापूर्वी तीच संख्या ३६०० ते ३७०० एवढी होती. त्यामुळे हा निर्णय चांगला असल्याचे अनेकांनी अभिप्राय दिला आहे. याबाबतचा तपशील संस्थान कमिटीकडून माजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांना सादर केला आहे  - अ‍ॅड. विकास ढगे पाटील, प्रमुख विश्वस्त

Web Title: Devotees object to Maha Puja ban on Sant dnyaneshwar maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.