गॉगलद्वारे विठ्ठलाची विविध रूपे आता देशभरातील भाविकांना पाहता येणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 12:19 IST2025-07-24T12:18:36+5:302025-07-24T12:19:02+5:30

विठ्ठलाची महापूजा आणि विविध रूपे सर्वसामान्य भाविकांना पाहता यावीत यासाठी विठ्ठल मंदिरात व्हीआर दर्शन सुविधेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाला.

Devotees across the country will now be able to see various forms of Vitthal through goggles; Inauguration by the Chief Minister | गॉगलद्वारे विठ्ठलाची विविध रूपे आता देशभरातील भाविकांना पाहता येणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

गॉगलद्वारे विठ्ठलाची विविध रूपे आता देशभरातील भाविकांना पाहता येणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

पंढरपूर : विठ्ठलाची महापूजा आणि विविध रूपे सर्वसामान्य भाविकांना पाहता यावीत यासाठी विठ्ठल मंदिरात व्हीआर दर्शन सुविधेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाला. गॉगलद्वारे देवाची विविध रूपे आता देशभरातील भाविकांना पाहायला मिळणार आहे. यापूर्वी उज्जैन आणि काशी विश्वेश्वर या देशातल्या दोन ठिकाणी अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध आहे.

यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. समाधान आवताडे, अभिजित पाटील, गोपीचंद पडळकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे उपस्थित होते.

संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत
संतांचे जीवन प्रेरणादायी असून, त्यांच्या जीवनकार्यातून आपल्याला विचारच नाही तर जीवनाचा मार्गही गवसतो. संत नामदेवांनी भागवत धर्माला वैश्विक धर्म केले आणि वारकरी विचाराला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले.
वारकरी संप्रदायात त्यांचे कार्य महान होते. अशा संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

भाविकांना घेता येणार थेट महापूजेचा आनंद 
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे भक्तनिवास व शहरातील इतर ठिकाणी भाविकांना देवाच्या पूजा व्हीआर गॉगलद्वारे पाहता येणार आहेत. अल्प शुल्क असलेल्या या सुविधेमुळे भाविकांना थेट देवाच्या गाभाऱ्यात उभे राहून समक्ष पाहिल्याचा आभास निर्माण होणार आहे. वर्षभरात विठुरायाच्या केवळ मोजक्याच महापूजा होतात, तुलनेत अनेक भाविकांना या महापूजेस उपस्थित राहण्याची इच्छा असल्याने या गॉगलच्या माध्यमातून या महापूजेचा आनंद भाविकांना घेता येणार आहे.

पंढरपूर विकास चोरी नव्हे, काहीही लपून-छपून होणार नाही
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी कोट्यवधी लोक पंढरपुरात येतात. त्यांची अव्यवस्था होते हे योग्य नाही. आपल्याला कोणताही विनाश करून कॉरिडॉर करायचा नाही; परंतु पंढरपूरचा विकास करणे म्हणजे चोरी नाही, कोणतीही गोष्ट लपून-छपून केली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ज्यांच्या दुकानावर घरांवर कॉरिडॉरमुळे कारवाई करावी लागेल त्यांना चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी समाविष्ट करून घेण्यात येईल, कोणाचेही नुकसान होणार नाही. सर्वांना समाविष्ट करून सोबत घेऊनच आपल्याला विकास करायचा आहे. ज्यावेळी लोकांमध्ये जाऊ त्यावेळी आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Devotees across the country will now be able to see various forms of Vitthal through goggles; Inauguration by the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.