GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 20:06 IST2025-12-06T20:00:27+5:302025-12-06T20:06:51+5:30
Devendra Fadnavis GenZ Connection: सर्वेक्षणात तरुणाईकडून त्यांच्याबद्दल केवळ समाधानच नव्हे, तर ठाम विश्वास दिसून आला आहे.

GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
Devendra Fadnavis GenZ Connection: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेत असणारे देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या सरकारचा एक वर्षाचा कालावधी नुकताच पूर्ण केला. फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. त्याआधी २०१९च्या निवडणुकांनंतर त्यांनी 'मी पुन्हा येईन' असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानुसार २०२४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ऐतिहासिक विजय मिळवून देत, देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यांच्या नव्या मंत्रिमंडळाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. या कालावधीत त्यांच्या सरकारला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. टीका आणि आरोपांनाही सामोरे जावे लागले. पण त्यातही त्यांच्या सरकारने आपला ठसा उमटवला. केवळ मध्यमवयीन किंवा ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर GenZ तरुणाईलाही फडणवीसांच्या कार्यशैलीवर विश्वास असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीबद्दल तरुण पिढीमध्ये आणि विशेषत: जेनझी मध्ये सकारात्मक दृष्टिकोन दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या एका राष्ट्रव्यापी सर्वेक्षणानुसार, फडणवीस यांच्या कामगिरी आणि नेतृत्व क्षमतेवर तरुणांनी मोठा विश्वास व्यक्त केला आहे. शुभ रिसर्चने केलेल्या सर्वेक्षणात फडणवीस यांच्याबद्दल तरुणाईकडून केवळ समाधानच नव्हे, तर ठाम विश्वास दिसून आला आहे. विशेषतः, निर्णयक्षमता आणि राज्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता या मुद्द्यांमुळे ते GenZ मतदारांमध्ये लोकप्रिय असल्याचे दिसून आले.
वयोगटानुसार सर्वेक्षण...
वर्षपूर्तीनंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, फडणवीस यांच्याबद्दल व्यक्त झालेले समाधान प्रत्येक वयोगटात महत्त्वाचे असल्याचे दिसून आले. तरुणाईत हा टक्का विशेष वाढल्याचे दिसून आले. राजकारणाबाबत गेल्या अनेक दशकांपासून उदासीन असलेल्या तरुणाईपैकी १८-२३ या वयोगटात तब्बल ६७% तरुणांना फडणवीसांची कार्यशैली भावली. तर २४-३५ वर्षे वयोगटातील ६५% तरुणाई त्यांच्या कार्याची चाहती झाली. ३६-५० वर्षे वयोगटातील मध्यमवयीन पिढीतही ६६% लोक मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीचै कौतुक करताना दिसले. तर नोकरीच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या ५१-६० वर्षे वयोगटातील तब्बल ६२% मतदारांना देवाभाऊंची स्टाईल आवडली. तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांमध्ये तब्बल ६८% नागरिकांनी त्यांची कामाची पद्धत उत्तम असल्याचे स्पष्टपणे सांगितले.

या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यातील तरुण वर्ग 'विश्वसनीय नेतृत्व' म्हणून पाहत आहे. त्यांनी घेतलेले निर्णय आणि राज्यासाठीचे व्हिजन तरुणाईला अधिक आपलेसे वाटत आहे. प्रौढ आणि वृद्ध मतदारांच्या तुलनेत तरुण मतदारांचा प्रतिसाद अधिक संतुलित आणि सकारात्मक असल्याने, त्यांच्या नेतृत्वाची सकारात्मक भावना भविष्यात टिकून राहील, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.