'शरद पवारांनी भाकरी फिरवली नाही, तर...' पवारांबाबत देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 16:36 IST2023-06-11T16:36:20+5:302023-06-11T16:36:47+5:30
शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष केल्यानंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या.

'शरद पवारांनी भाकरी फिरवली नाही, तर...' पवारांबाबत देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Devendra Fadnavis on Ajit Pawar: नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा 24 वा वर्धापन दिन साजरा झाला. कार्यक्रमात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष पद देण्यात आले आहे. या घोषणेनंतर अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. या वर आता भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शनिवार(10 जून) रोजी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली. शरद पवारांच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात अजित पवार नाराज असल्याच्य चर्चा सुरू झाल्या. याबाबत माध्यम प्रतिनिधींनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता फडणवीसांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले फडणवीस?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, फडणवीस म्हणाले, 'शरद पवारांनी भाकरी फिरवली, असे म्हणतात. पण, त्यांच्या निर्णयाला भाकरी फिरविणे नाही, तर ही धुळफेक करणे म्हणतात. परंतु हा त्यांचा अंतर्गत विषय आहे', अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.
अजित पवारांची प्रतिक्रिया
शरद पवारांच्या निर्णयानंतर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी राष्ट्रीय पातळीवरचा पदाधिकारी नाही, राज्य पातळीवर काम करणारा आहे. माझ्याकडे विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी आहे. अलीकडे मिडिया माझ्या इतकं का प्रेमात पडलाय कळत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजीच्या बातमीचे खंडन केले आहे. मुळात माझ्यावर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी आहे. ज्यांचे जास्त आमदार त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता असतो. विरोधी पक्षनेतेपदाचे कामकाज मी करतोय. जाणीवपूर्वक माझ्याबाबत अशा बातम्या येत आहेत. बातम्यांचे खंडन करायचे. काय झाले ते सांगायचे त्यातच माझा वेळ जातोय, असंही अजित पवार म्हणाले.