'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 21:04 IST2025-12-06T21:02:46+5:302025-12-06T21:04:58+5:30
Ladki Bahin Yojana, Devendra Fadnavis: महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना अजूनही 'नंबर १'!

'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
Ladki Bahin Yojana, Devendra Fadnavis: लोकसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार धक्का महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. ही योजना महाराष्ट्रातील महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरली. या योजनेमुळे महिलांना आर्थिक पाठबळ मिळाले. परिणामी विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला धडाकेबाज विजय मिळाला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात आश्वासक चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे वर्षभरानंतरही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हीच राज्यातील सर्व सरकारी योजनांपैकी सर्वात लाडकी असल्याचे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे. त्यातही खास गोष्ट म्हणजे, महिलांसाठी फायदेशीर असलेल्या या योजनेला पुरुषवर्गातूनही उघडपणे पाठिंबा मिळताना दिसतो आहे.
महिला-केंद्रित योजनेला पुरुष मतदारांचाही पाठिंबा
महाराष्ट्र शासनाच्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांसोबतच पुरुषांकडूनही मोठे समर्थन मिळत असल्याचे एका राष्ट्रव्यापी सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. ही योजना राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण मानली जात असताना, पुरुषांनीही या योजनेला उत्साहवर्धक प्रतिसाद दिला आहे. एका सर्वेक्षणातून, राज्यातील सर्वात आवडत्या सरकारी योजना कोणत्या आहेत, याबद्दल लोकांचे मत जाणून घेण्यात आले. या सर्वेक्षणात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेला सरासरी ५० टक्के नागरिकांची पसंती मिळाली आहे. केवळ महिलांचा विचार केल्यास, ५३ टक्के महिलांनी ही योजना सर्वाधिक पसंतीची असल्याचे सांगितले आहे. तर पुरुषवर्गातूनही तब्बल ४६ टक्के पुरुषांनी या योजनेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. हा प्रतिसाद दर्शवितो की, महिला-केंद्रित असलेल्या या योजनेचे सामाजिक महत्त्व पुरुष मतदारांनीही ओळखले आहे.
वयोगटानुसार बोलायचे झाल्यास लाडकी बहीण योजना सर्वच वयोगटात सर्वात लाडकी आहे. या योजनेला १८-२३ वर्षे, २४-३५ वर्षे या वयोगटात ५३ टक्के तर ३६-५० वर्षे वयोगटात ५२% लोकांची पसंती आहे. तसेच, ५१-६० वर्षे गटात ५०% नागरिक या योजनेला लाभदायक मानतात. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, सर्व वयोगटातील मतदारांनीही या योजनेचे स्वागत केले आहे.
विभागनिहाय बोलायचे झाल्यास, लाडकी बहीण योजनेला उत्तर महाराष्ट्रातून ५७%, विदर्भातून ५८%, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून ५३% पसंती आहे. केवळ मुंबई, ठाणे आणि कोकण विभागात केवळ ३४% लोक या योजनेचा स्वीकार करताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वेक्षणानुसार 'मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना' सर्वाधिक पसंतीची सरकारी योजना ठरली आहे. या योजनेला पुरुषांनीही दिलेला पाठिंबा या योजनेच्या व्यापक स्वीकृतीचे आणि सामाजिक परिणामकारकतेचे लक्षण आहे.

या योजनेव्यतिरिक्त महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना देखील सरासरी ३३ टक्के नागरिकांमध्ये लोकप्रिय आहे. त्यात ३० टक्के पुरुष आणि ३६ टक्के महिलांनी या योजनेला पसंती दर्शवली आहे.