कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 06:37 IST2025-09-21T06:36:22+5:302025-09-21T06:37:31+5:30
साटम यांनी विरोधकांवर डागलेली तोफ पाहून भाजपत हा नवा ब्रँड उदयास आल्याची चर्चा रंगली आहे.

कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
भाजपने आणला नवा ‘ब्रँड’
मुंबई भाजपच्या नेतृत्वातील बदलानंतर झालेला विजय संकल्प मेळावा हा महापालिका रणांगणाची पहिली चुणूक होती. आ. अमित साटम यांच्या हाती मुंबई भाजपची सूत्रे देऊन पक्षाने संघटनेला आक्रमक व तरुण चेहरा दिला आहे. ते कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आणि विरोधकांना भिडण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. अमित कर्तृत्वाने पुढे आला, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विधान अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांना टोला होता. फडणवीस यांनी ठाकरे ब्रँडचा उल्लेख करत टीका केली. त्याचवेळी आ. साटम यांनी विरोधकांवर डागलेली तोफ पाहून भाजपत हा नवा ब्रँड उदयास आल्याची चर्चा रंगली आहे.
‘आमचा तो ब्रँड, दुसऱ्याची ती ब्रँडी’
बेस्टच्या निवडणुकीत, ‘आमचा ब्रँड आहे’ असे म्हणणाऱ्यांचा ‘बॅण्ड वाजला’, अशा शब्दांत भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धवसेनेवर टीका केली. यावर खा. संजय राऊत यांनी पलटवार केला. फडणवीस यांना ठाकरे ‘ब्रँड’ची फार चिंता आहे. ती चिंता नसून भीती आहे. ठाकरे हाच ब्रँड आहे, असा पलटवार केला. फडणवीस सरकारमधील एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी यावेळी टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी ‘ब्रँडी’ असा उल्लेख केला. आतापर्यंत ‘आपला तो बाब्या अन् दुसऱ्याचं ते कार्ट’ अशी म्हण ऐकिवात होती, आता ‘आमचा तो ब्रँड दुसऱ्याची ती ब्रँडी’ ही म्हण रुढ झाली तर आश्चर्य वाटायला नको.
...अन् विलासरावांची आठवण झाली
कल्याण डोंबिवलीमधील २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा विषय प्रलंबित असून हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. परंतु तरीही येथील महानगरपालिका आयुक्तांनी प्रभाग रचना करताना त्या गावांचा समावेश महापालिका हद्दीत केला. त्यावर संघर्ष समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली. समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी संतोष केणे यांनी थेट दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा दिला. देशमुख यांनी २७ गावांच्या स्वतंत्र ग्रामपंचायती केल्या होत्या. तसे नेते होणे नाही, असे ते म्हणाले. केणे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या विषयाला पुन्हा हात घातल्याने त्याची चर्चा नक्कीच आहे.
अर्थ खात्याचा झटका बसला...
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उपस्थित असलेले मंत्री चंद्रकांत पाटील भाषणात म्हणाले, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विस्तारासाठी चिखली येथे २८ एकर जागा दिली आहे. त्यासाठी राज्य सरकार मदत करेल. त्याचा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणात केला. चंद्रकांतदादा सीओईपीला मदत करण्यासाठी खूप सावधपणे बोलले आहेत. कारण त्यांना अर्थ विभागाचा दोन ते तीनदा झटका बसला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला नसेल तर नवल.