Devendra Bhuyar is excluded from Medha 2020 | अमृतवाहिनी कार्यक्रमात घराणेशाहीलाच मान ? भुयार यांना वगळल्याने सोशल मीडियावर संताप

अमृतवाहिनी कार्यक्रमात घराणेशाहीलाच मान ? भुयार यांना वगळल्याने सोशल मीडियावर संताप

मुंबई - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पार्श्वभूमी लाभलेल्या युवा नेत्यांची विधासभेत एन्ट्री झाली. या नेत्यांना बाळासाहेब थोरात यांच्या वतीने  घेण्यात आलेल्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या मेधा-२०२० युवा संस्कृतीत महोत्सवात आमंत्रित करण्यात आले होते. मात्र यात सर्वसामान्य पार्श्वभूमी असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  आमदार देवेंद्र भुयार हे  दिसले नाही. त्यामुळे सर्वसामान्य पार्श्वभूमी लाभलेले भुयार उपेक्षीत का, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित करण्यात येत आहे.  

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शरद पवारांचे नातू रोहित पवार, सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव, ऋतुराज पाटील ही मंडळी पहिल्यांदाच विधानसभेत दाखल झाली आहे. सध्या सोशल मीडियावर हे युवा नेते चर्चेत आहे. तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या देवेंद्र भुयार यांचीही चर्चा नेहमीच होते. भुयार यांनी मागील सरकारमधील कृषीमंत्र्यांचाच पराभव केला आहे. त्यामुळे ते तरुणांमध्ये प्रसिद्ध आहेत. 

दरम्यान अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा-२०२० युवा संस्कृतीत महोत्सवात घराणीशाहीलाच प्राधान्य देण्यात आले अशी चर्चा सुरू झाली आहे.  संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्धीकी यांना आमंत्रित करण्यात आले होते. या सर्वांनाच राजकीय वारसा लाभलेला आहे. यावेळी या नेत्यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र या कार्यक्रमात सर्वसामान्य पार्श्वभूमी असलेले देवेंद्र भुयार दिसले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

भुयार यांनी विधानसभा निवडणुकीत कृषीमंत्र्यांचा पराभव केला होता. त्यामुळे राज्यभर त्यांचे कौतुक झाले होते. मात्र अमृतवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांचा समावेश नव्हता. त्यांना आमंत्रण नव्हते की, ते येऊ शकले नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 
 

Web Title: Devendra Bhuyar is excluded from Medha 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.