महाराष्ट्रात डिटेन्शन सेंटर उभारणार नाही - गृहमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 02:51 AM2019-12-29T02:51:17+5:302019-12-29T06:26:18+5:30

नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत सुस्पष्टता नाही. त्यामुळे राज्यातील कोणत्याही जाती, धर्माच्या बांधवांनी घाबरण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

Detention center will not be set up in Maharashtra - Home Minister Eknath Shinde | महाराष्ट्रात डिटेन्शन सेंटर उभारणार नाही - गृहमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्रात डिटेन्शन सेंटर उभारणार नाही - गृहमंत्री एकनाथ शिंदे

googlenewsNext

ठाणे : नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत सुस्पष्टता नाही. त्यामुळे राज्यातील कोणत्याही जाती, धर्माच्या बांधवांनी घाबरण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात डिटेन्शन सेंटरही उभारू देणार नसल्याची ग्वाही राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिली. काही मंडळी मुस्लिम बांधवांना शिवसेनेच्या जवळ जाऊ नका, असे सांगतात. मात्र, जोपर्यंत तुम्ही जवळ येणार नाहीत, तोपर्यंत शिवसेना काय आहे, हे तुम्हाला समजणार कसे, असेही त्यांनी यावेळी सांगत, मुस्लिम बांधवांना आम्ही तुमच्यासोबत होतो, आहोत आणि यापुढेही असणार, असे स्पष्ट केले.

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात ठाण्यातील मुस्लिम बांधव येत्या काही दिवसांत मोर्चा काढणार आहेत. परंतु, या मोर्चाच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शिंदे यांच्या मध्यस्थीने शनिवारी ठाण्यात रात्री एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत शिंदे यांनी कोणालाही घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सांगितले. या राज्यात कोणत्याही धर्माच्या, जातीच्या व्यक्तीला भय वाटणार नाही, असे निर्णय घेण्यासाठी हे सरकार बनले आहे. त्यामुळे ज्या दिवशी नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर करण्यात आला, त्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोणत्याही जाती, धर्माच्या लोकांना त्रास होणार नाही, असे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात सध्या सर्वोच्च न्यायालयात दावा सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने त्यांच्याकडून मुस्लिम समाजाला उचकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोणीही अशा अफवांवर विश्वास न ठेवता शांततेच्या मार्गाने आपली मते व्यक्त करावीत, असे शिंदे म्हणाले.

Web Title: Detention center will not be set up in Maharashtra - Home Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.