छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर नष्ट करा, शिवसेना शिंदे गटाच्या खासदाराची लोकसभेत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 18:59 IST2025-03-12T18:58:13+5:302025-03-12T18:59:29+5:30
Naresh Mhaske News: शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आज संसदेत उपस्थित करत छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची मागणी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर नष्ट करा, शिवसेना शिंदे गटाच्या खासदाराची लोकसभेत मागणी
नवी दिल्ली - मागच्या काही दिवसांपासून मुघल बादशाहा औरंगजेब याच्या छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या कबरीचा विषय चर्चेत असून, स्वराज्याचा शत्रू असलेल्या आणि छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर तिथून हटवण्याची मागणी सातत्याने होत आहे. त्यातच आता, शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आज संसदेत उपस्थित करत छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची मागणी केली आहे.
याविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना नरेश म्हस्के यांनी सभागृहात सांगितले की, भारतीय संस्कृतीशी काही देणेघेणे नसलेल्या, पारतंत्र्य आणि क्रूरतेची निशाणी असलेल्या मुघल आणि ब्रिटिशांच्या वारशांचे आपण गेली ७५ वर्ष `ऐतिहासिक' या गोंडस नावाखाली जतन करत आलो आहोत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या संरक्षणाखाली ३,६९१ स्मारके आहेत. परंतु यापैकी २५ टक्के स्मारकांना कोणतेही राष्ट्रीय किंवा सांस्कृतिक महत्त्व नसल्याची धक्कादायक माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. भारतीय वारशांचे अधिक प्रमाणात जतन करण्यासाठी ब्रिटिश आणि मुघल प्रतिकांपासून देशाला मुक्त करावे तसेच क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर नष्ट करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत केली.
काल स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस होता. ज्या क्रूरकर्म्याने छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मांतर करण्यासाठी अतोनात छळले, हजारो हिंदू धर्मियांची मंदिरे तोडली, धर्मांतरासाठी शिखांचे ९ वे धर्मगुरू तेजबहादूरसिंग यांना चांदनी चौक येथे मारले, १० वे धर्मगुरू गुरुगोविंदसिंग यांच्या दोन्ही मुलांना चार भिंती आड मारले अशा औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील खुनादाबाद येथे आहे. त्या कबरीचे संरक्षण ASI करत असून ही बाब संतापजनक आणि लज्जास्पद असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आपण ऐतिहासिक वारशांचे रक्षण करण्याच्या नावाखाली वसाहतवादी भूतकाळाचे ओझे वाहून नेत आहोत. या संरक्षित स्मारकांमध्ये ब्रिटीश सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या ७५ कबरी आहे. ज्यांचा भारताच्या सभ्यता आणि संस्कृतीशी काहीही संबंध नाही. भारताला गुलाम बनविणाऱ्या आणि आपल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांवर अत्याचार करणाऱ्यांच्या आठवणी आपण आपला वारसा म्हणून जपतो आहोत हे योग्य आहे का? असा सवाल करत आपल्या स्वाभिमानाचा आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचा आपण अवमान करत असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.