“राज्याच्या तिजोरीवर शेतकरी-महिला-युवकांचा पहिला हक्क; एकही योजना बंद होणार नाही”: DCM शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 11:12 IST2026-02-05T11:11:21+5:302026-02-05T11:12:10+5:30
Deputy CM Eknath Shinde News: कोणीही कितीही विरोध केला, कोर्टात गेले, आरोप केले तरी सरकारने सुरू केलेल्या योजना अखंड सुरू राहतील, हा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला.

“राज्याच्या तिजोरीवर शेतकरी-महिला-युवकांचा पहिला हक्क; एकही योजना बंद होणार नाही”: DCM शिंदे
Deputy CM Eknath Shinde News: राज्याच्या तिजोरीवर सर्वप्रथम अधिकार हा शेतकरी, कष्टकरी, युवक आणि महिलांचा असल्याचे ठाम प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर प्रचार सभेत केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेत मार्गदर्शन करताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, या घटकांसाठी सुरू करण्यात आलेली एकही योजना कधीही बंद होणार नाही. कोणीही कितीही विरोध केला, कोर्टात गेले, आरोप केले तरी सरकारने सुरू केलेल्या योजना अखंड सुरू राहतील, हा शब्द त्यांनी जनतेला दिला.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार दिलीप सोपल यांच्यावर भरभरून स्तुतीसुमने उधळली. आमदार कसा असावा, तर दिलीप सोपल यांच्यासारखा असावा. ते सगळ्यांचे मित्र आहेत, शत्रू कोणाचाही नाही. सहा-सात वेळा निवडून येणं हा योगायोग नाही, तर वर्षानुवर्षांच्या कामाची पोचपावती आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. भर उन्हातही लोकांची गर्दी पाहून सोपल यांच्या कामाची जाणीव होते, असे सांगत पुढील काळात ते पुन्हा एकदा मोठ्या फरकाने विजयी होतील आणि मंत्रिमंडळात त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निधनाचा उल्लेख करत महाराष्ट्रावर शोककळा पसरल्याची भावना व्यक्त केली.
अनेक योजना सरकारने राबवल्या आहेत
सरकारच्या योजनांबाबत बोलताना शिंदे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी १०० टक्के फी माफी, शेतकरी सन्मान योजना अंतर्गत दरवर्षी ६,००० रुपये थेट खात्यात जमा, पीक विमा योजना, अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानभरपाईसाठी एनडीआरएफ नियमांमध्ये बदल आणि दुप्पट मदत अशा अनेक योजना सरकारने राबवल्या आहेत.
राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्याचाच आहे
शेतकऱ्यांबाबत बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, शेतकरी हा या राज्याचा मायबाप आहे. राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्याचाच आहे. मराठवाडा दुष्काळग्रस्त भाग असून ‘दुष्काळ’ हा शब्दच पुसून टाकून दुष्काळमुक्त मराठवाडा घडवायचा आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जवळगाव मध्यम प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे, बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी निधी उपलब्ध करणे आणि अपर तहसील कार्यालय उभारणे या मागण्या त्यांनी तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तरुणांच्या रोजगारावरही त्यांनी भर दिला.
दरम्यान, वैराग नगरपंचायतीसाठी मोठ्या प्रमाणात विकासकामांची घोषणा करत त्यांनी रस्ते व गटारींसाठी २० कोटी, वैकुंठ स्मशानभूमीसाठी ५ कोटी, सीसीटीव्हीसाठी २ कोटी आणि नगरपंचायत नवीन इमारतीसाठी ७ कोटी, असा एकूण सुमारे ३४ कोटींचा निधी मंजूर करण्याचा शब्द दिला. नगरपंचायतीची चांगली इमारत उभारली पाहिजे, प्रशासनासाठी आवश्यक सुविधा दिल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी तात्काळ ५ कोटी देण्याची घोषणाही त्यांनी केली.