मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी दीड दिवसाचा गणपती विराजमान असतो. या दीड दिवसांत राज यांच्या घरी विविध मान्यवर बाप्पाच्या दर्शनाला येत असतात. त्यात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेराज ठाकरेंच्या घरी पोहचले. राज यांच्या घरातील गणेशाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्यावर्षी गणेश दर्शनाला आलो, तसेच याही वर्षी गणपतीचं दर्शन घ्यायला आलो. दर्शन घेऊन आता निघालो आहे. आम्ही दरवर्षी येतो मात्र यावेळी काही लोक नवीन आले त्याचा आनंद झाला. बाप्पाला साकडे घालण्याची गरज नाही. महाराष्ट्रावरील सगळी विघ्ने दूर कर, शेतकऱ्यांना सुखी ठेव. लाडके भाऊ, लाडक्या बहिणी आणि राज्यातील जनतेने चांगले दिवस येऊ दे आणि जे दु:खी असतात त्यांना सुख येऊ दे. आजच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. आमचा स्नेह आहे आणि स्नेहभोजनही होईल. कुठलेही कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्याचा आनंद आहे. आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो असं त्यांनी म्हटलं.
तसेच गणपती बाप्पाने सगळ्यांना सुबुद्धी द्यावी. त्यातच सगळ्यांचे कल्याण आहे. मी अनेक वर्षापासून राज ठाकरेंच्या घरी येतो. आमचे संबंध चांगले आहेत. आम्ही आधीपासून दर्शनाला येतो, काही जण पहिल्यांदा आलेत. गणपतीत प्रत्येक जण एकमेकांच्या घरी जात असतो. गणपती दर्शनाला आलोय, त्यात राजकीय चर्चा नाही. काही तरी 'राज' राहू द्या. सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात असं सूचक विधानही एकनाथ शिंदे यांनी महायुतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिले.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरे यांच्या घरी पहिल्यांदा उद्धव ठाकरे सहकुटुंब पोहचले. उद्धव यांनी सहकुटुंब गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी एकत्र स्नेहभोजन घेतले. जवळपास दोन तास उद्धव 'शिवतीर्थ'वर होते. त्यातील दहा मिनिटे या दोन भावांमध्ये खासगीत चर्चा झाल्याचेही समजते. उद्धव ठाकरे निघून गेल्यानंतर काही वेळाने मुख्यमंत्री फडणवीस 'शिवतीर्थ'वर पोहचले. यावेळी मुख्यमंत्री आणि राज यांच्यात १५ मिनिटे बंदद्वार चर्चा झाली.