“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 11:10 IST2025-05-01T11:09:00+5:302025-05-01T11:10:53+5:30
Deputy CM Ajit Pawar News: मनाचा मोठेपणा विरोधकांमध्ये नाही, असे सांगत जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयावरून टीका करणाऱ्यांना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले.

“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
Deputy CM Ajit Pawar News: जातनिहाय जनगणना करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. पुढील जनगणनेत ही प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे. या विषयाचा विरोधकांनी राजकीय हत्यार म्हणून वापर केल्याबद्दल सरकारने टीका केली. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी अशा प्रकारच्या जनगणनेची मागणी केली होती. बिहार, तेलंगणा, कर्नाटकमध्ये जातनिहाय सर्वेक्षणही झाले आहे. यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, भाजपा आणि काँग्रेस पक्षात श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच जातनिहाय जनगणना निर्णयावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे.
काँग्रेस खासदार आणि लोकसेभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना निर्णयाच्या घोषणेला पाठिंबा देतानाच केंद्र सरकारवर टीका केली. जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने अकस्मात जाहीर केला असला तरी याचे आम्ही स्वागत करतो. मात्र, ही जनगणना कधी करणार याचा कालावधीही सरकारने जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही देशभरात जातनिहाय जनगणना करण्यासाठी मोहीम राबवली, ज्याचा परिणाम म्हणजे सरकारने घेतलेला हा निर्णय आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले. यावरून आता भाजपा नेते राहुल गांधी आणि काँग्रेसवर पलटवार करत असून, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावरून टोलेबाजी केली.
आधी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही
बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, जातीय जनगणना व्हावी अशा प्रकारची मागणी सर्व जणांची होती. मी माझ्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने राज्य सरकारच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो. निवडणूक ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. देशात निवडणुका सुरूच असतात. कुठे ना कुठे निवडणूक होत असते. आता देशात लोकसभा निवडणुका नाहीत. पुढील लोकसभा निवडणूक यायला साडेचार वर्षे आहेत. कोणत्या ना कोणत्या राज्यात विधानसभा निवडणुका होत असतात. त्यामुळेच केंद्र सरकारने ‘वन नेशन वन इलेक्शन’ हा प्रस्ताव आणला आहे. सध्या कुठल्याही कामाला विरोधक चांगले म्हणत नाही. पूर्वी दिलदार विरोधक होते. आता चंद्रशेखर यांच्यासारखे विरोधक नाही. त्यांच्यासारखे विरोधक असते तर त्यांनी कौतुक केले असते. वाजपेयी यांनीही कौतुक केले असते. मनाचा मोठेपणा विरोधकांमध्ये नाही, असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला.
दरम्यान, जातनिहाय जनगणनेच्या निर्णयातून केंद्र सरकारची सामाजिक समता आणि सर्व घटकांच्या हक्कांबाबतची बांधिलकी स्पष्ट होते, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. काँग्रेसने सत्तेत असताना जातीनिहाय जनगणनेचा सातत्याने विरोध केला. मात्र या मुद्द्याचा विरोधी पक्षात असताना काँग्रेसने राजकीय फायद्यासाठी वापर केला, अशी टीका अमित शाह यांनी केली.