पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:43 IST2025-07-29T12:41:24+5:302025-07-29T12:43:06+5:30

Ajit Pawar And Nitin Gadkari : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिलं आहे.

deputy cm Ajit Pawar letter to union minister Nitin Gadkari Over Pune traffic issue | पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड), राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत), तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) या तिन्ही प्रमुख राष्ट्रीय महामार्गाचे तातडीने रुंदीकरण करावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या पत्रात, पुणे महानगर आणि औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड) – सध्या ४ लेन असलेला हा रस्ता ६ लेनमध्ये रुपांतर करावा, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत) – विद्यमान ४ लेन रस्त्याचे ६ लेनमध्ये रूपांतर करावा, तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) – सध्या २ लेन असलेला मार्ग ४ लेन करण्याची आवश्यकता आहे. या तिन्ही मार्गांवर शिक्षण संस्था, औद्योगिक पट्टा, वसाहती, रुग्णालये, पेट्रोलियम आणि वाहन उद्योग तसेच व्यापारी हब असल्यामुळे वाहतुकीचा ताण प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. रस्त्यांवर सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून वाहनचालकांच्या सुरक्षेवरही प्रश्न निर्माण झाले आहेत असंही पत्रात म्हटलं आहे.

या मार्गांवरील प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येची कमाल मर्यादा ओलांडली आहे. अशा परिस्थितीत या महामार्गावर तात्काळ लेन वाढवण्याचे काम करण्यात यावे, जेणेकरून येत्या काळात उभारल्या जाणाऱ्या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामासाठीही पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकेल. हे तिन्ही महामार्ग पुणे शहराच्या प्रवेशद्वारांशी जोडले गेलेले असल्यामुळे, बाह्य भागातील मोठ्या प्रमाणावर वाहने शहरात प्रवेश करताना मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. यामुळे या मार्गांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावरील रुंदीकरणाच्या कामास सध्या चालू असलेल्या एलिव्हेटेड हायवे निविदेच्या अंतिम टप्प्यापर्यंत तात्पुरता पर्याय म्हणूनही उपयोग होईल हेही अजित पवार यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच नितीन गडकरी यांनी या प्रस्तावास मान्यता देऊन आवश्यक निधी आणि प्रशासकीय मंजुरी तातडीने मिळवून देण्याची विनंती अजित पवार यांनी केली आहे, जेणेकरून पुणे औद्योगिक परिसरातील वाहतूक समस्या दूर होण्यास मदत होईल.

Web Title: deputy cm Ajit Pawar letter to union minister Nitin Gadkari Over Pune traffic issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.