“जळगाव रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी”; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दु:ख व्यक्त, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 20:31 IST2025-01-22T20:29:49+5:302025-01-22T20:31:03+5:30
Deputy CM Ajit Pawar Reaction On Jalgaon Railway Accident: जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या वारसांना राज्य शासनाकडून ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.

“जळगाव रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी”; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दु:ख व्यक्त, म्हणाले...
Deputy CM Ajit Pawar Reaction On Jalgaon Railway Accident: पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरुन कर्नाटक एक्सप्रेस आली. या ट्रेनखाली येऊन जवळपास १२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. ही भीषण घटना पाचोरा ते परधाडे दरम्यान घडली. यात ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
माहिजी-परधाडे स्थानक येण्यापूर्वी एका बोगीत चैन ओढली गेली. त्यानंतर वेगात असलेल्या रेल्वेगाडीने अचानक ब्रेक दाबायला सुरुवात केली. त्यामुळे रेल्वेरुळांवर ठिणग्या उडत गेल्या. परधाडे स्टेशनवर रेल्वेगाडी थांबली. तेव्हा एका बोगीतील प्रवाशांना या ठिणग्या दिसल्यावर बोगीत आग लागली असावी, या शक्यतेने ५० ते ६० जण समोरच्या रुळावर धावले. तशातच समोरुन वेगात कर्नाटक एक्स्प्रेस आली. त्यावेळी रुळावरच्या प्रवाशांची धावाधाव सुरु केली असतानाच काहीजण रेल्वेगाडीखाली चिरडले गेले, असे म्हटले जात आहे.
जळगाव रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी
जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे पारधाडे रेल्वेस्टेशननजिक रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. अपघाताची घटना कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून अपघाताची माहिती घेतली तसेच जखमी प्रवाशांना तातडीची मदत व मोफत वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन स्वत: घटनास्थळी पोहचले असून जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षकांसह जिल्हा यंत्रणा युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसहून जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून त्यांनी अपघाताची माहिती घेऊन प्रशासनाला मदतकार्यासंदर्भात आवश्यक निर्देश दिले आहेत. जिल्हा प्रशासन आणि रेल्वे यंत्रणा समन्वयातून बचाव आणि मदतकार्य करीत आहे. मदतकार्य रात्रीही सुरु राहणार आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा अपघातस्थळी पोहोचली आहे. मृतांच्या वारसांना राज्य शासनाकडून ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.