“मला हलक्यात घेऊ नका हे नेमके कोणासाठी?”; अजित पवारांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 08:48 IST2025-02-24T08:47:55+5:302025-02-24T08:48:07+5:30
Deputy CM Ajit Pawar And Eknath Shinde: मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त एकनाथ शिंदे आणि अजित पवार एका व्यासपीठावर आले होते.

“मला हलक्यात घेऊ नका हे नेमके कोणासाठी?”; अजित पवारांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले...
Deputy CM Ajit Pawar And Eknath Shinde: दिल्लीत झालेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी संमेलनात अनेक ठराव करण्यात आले. तसेच अभिजात मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देण्यासंदर्भात काही आश्वासने महायुती सरकारकडून देण्यात आली. यावेळी राजकीय चर्चांचे फडही रंगले. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका विधानाचा आधार घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक प्रश्न केला आणि लगेचच एकनाथ शिंदे यांनी त्याचे उत्तरही दिले.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन हे राज्यपाल, मंत्री, आमदार आणि खासदारांसाठी आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार मराठी माणसांसाठी नवी दिल्लीत भव्य सांस्कृतिक भवन उभारणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना केली. तसेच मराठीला अभिजात वैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मराठी ज्ञानभाषा व्हावी, मराठीची उपयुक्तता वाढावी, ती बहुजात आणि बहुज्ञात व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, प्रसारासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही, असेही अजित पवार म्हणाले.
मला हलक्यात घेऊ नका हे नेमके कोणासाठी?
मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त एकनाथ शिंदे आणि अजित पवार एका व्यासपीठावर आले होते. या कार्यक्रमाच्या भाषणात अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली. आता परवा दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असा काही शब्द वापरला की, मला हलक्यात घेऊ नका. आता एकनाथ शिंदे नेमके कोणाला म्हणाले तेच कळायला मार्ग नाही. मग मशालीने हलक्यात घ्यायचे नाही की अजून कोणाला घ्यायचे नाही?, अशी शंका अजित पवारांनी उपस्थित केली. यावर लगेचच, मला हलक्यात घेऊ नका हे अडीच वर्षांपूर्वीचे होते, असे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले.
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि मी एका व्यासपीठावर आलो की, आमच्यावर कॅमेरे असतात. एवढेच नाही तर आमच्या हावभावावर लक्ष असते. आमच्या चेहऱ्यावर हास्य आहे की नाही तेही पाहतात. त्यामुळे माझ्या मनाला नेहमी सांगतो की, चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे, नाहीतर दुसरी बातमी व्हायची, अशी खोचक टोलेबाजी अजित पवारांनी केली.