Deputy CM Ajit Pawar News: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचंड मोठा विजय झाला. परंतु, त्यानंतर महायुतीत अनेक मुद्द्यांवरून नाराजीनाट्य, मानापमान नाट्य घडल्याचे पाहायला मिळाले. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न अद्यापही सुटलेला दिसत नाही. यातच एका उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून भाजपा खासदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका कृतीवर नाराज झाल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार होते. या कार्यक्रमाची वेळ सकाळी ६.३० वाजताची होती. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाच्या नियोजित वेळेपूर्वीच त्या ठिकाणी पोहोचले आणि उद्घाटन केले. यावरून भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यातील काही संवाद मीडियाच्या कॅमेरात कैद झाला.
मेधा कुलकर्णी यांची नाराजी, अजित पवारांनी केले पुन्हा उद्घाटन
परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती. परंतु, अजित पवारांनी नियोजित वेळेपूर्वीच येऊन उद्घाटन उरकले. यावरून मेधा कुलकर्णी नाराज झाल्या. दादा, ६.३० ची वेळ होती. आता ६.२४ वाजत आहेत. तुम्ही आधीच उद्घाटन केले, असे मेधा कुलकर्णी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगत, नाराजी व्यक्त केली. यानंतर, अजित पवारांनी मला माहिती नव्हते, परत उद्घाटन करू असे म्हटले. अजित पवारांच्या उत्तरावर मेधा कुलकर्णी यांनी, असे कसे दादा. असे होत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर पुन्हा अजित पवार यांनी इमारतीचे उद्घाटन केले.
दरम्यान, सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन संपन्न झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप नेत्या आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे उद्घाटन पार पडले आहे. यावेळी अजित पवार यांनी उड्डाणपूलाच्या कामाची माहिती घेतली. या पुलामुळे राजाराम पूल ते वडगावकडे जाणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.