पुणे : राज्यातील आता जुन्या वृक्षांना संरक्षण मिळणार असून, शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून ते ‘हेरिटेज’ म्हणून घोषित करण्यात येणार आहेत. तसेच राज्यात कमी वेळेत ‘घनवन’ तयार करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत घेतला. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकार राज्यात जुन्या वृक्षांची माहिती संकलित केली जात आहे. त्यांची या संदर्भात आज बैठक झाली.जुन्या वृक्षांना ‘हेरिटेज’ घोषित करावे, यासाठी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानंतर कर्वेनगर येथील त्रिशतकवीर वडाचे झाड, गोगलवाडी येथील अडीचशे वर्षांचे नांदु्रकचे झाड या विषयी देखील वृत्त दिले होते.
जिल्हानिहाय वृक्षसंमेलन होणारनिसर्गाच्या संवर्धनासाठी राज्यभर वृक्ष लागवड व संवर्धन करण्यात येत असून त्याला चालना देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात वन विभाग आणि महसूल विभागाच्या जागेवर वनराई उभारण्यात येणार आहे. राज्यभर जिल्हानिहाय वृक्षसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.