ज्या देशात मुस्लिमांची संख्या ५१ टक्के झाली, तिथे लोकशाही, धर्मनिरपेक्षता संपली -नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 17:30 IST2024-12-18T17:28:21+5:302024-12-18T17:30:41+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिंदुत्वाबद्दल बोलताना इतिहासाचा संदर्भ देत मुस्लिमांची लोकसंख्या वाढलेल्या देशात लोकशाही संपल्याचे सांगितले.

ज्या देशात मुस्लिमांची संख्या ५१ टक्के झाली, तिथे लोकशाही, धर्मनिरपेक्षता संपली -नितीन गडकरी
भारतीयत्व, राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व याबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दाखले दिले. हिंदुत्व म्हणजे काय हे समजून न घेता, हिंदुत्व म्हणजे अल्पसंख्याक विरोधी, मुस्लीम विरोधी असे म्हटले जाते, असे गडकरी म्हणाले. प्रश्नाला उत्तर देताना गडकरींनी हिंदुत्वाचा अर्थ सांगितला.
एका मुलाखतीत 'भाजप आणि उजव्या विचाधारेचे काही नेते असे म्हणायचे की, मुस्लीम जिथे अल्पसंख्याक असतात, तिथे बहुसंख्याक बनण्याचा प्रयत्न करतात. तसे मुस्लिमांना सांगितले जाते, असे बोलले जाते. तुमचं याबद्दल मत काय आहे?, असा प्रश्न नितीन गडकरींना विचारण्यात आला.
नितीन गडकरी म्हणाले, "बघा एक गोष्ट लक्षात ठेवा. मी फक्त इतिहासाच्या अनुषंगाने तुम्हाला हे सांगतोय. जगभरात ज्या देशात ५१ लोकसंख्या मुस्लिमांची झालीये, त्या देशात लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता नष्ट झाली."
"समस्या अशी आहे की, मुस्लीम समाजात शिक्षणाला प्रोत्साहन देऊन आणि मी हे मानतो की, भारतीयत्व हेच हिंदूत्व आहे आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, हिंदूत्व हा जगण्याचा मार्ग आहे", असे गडकरी म्हणाले.
गडकरींनी सांगितला हिंदुत्वाचा अर्थ
"आपल्या देशात कोणी मंदिरात जातात, कोणी मशिदीत जातात, कोणी बुद्धविहारात, कोणी चर्चेमध्ये जातात. प्रत्येकाची प्रार्थनेची पद्धत वेगळी आहे, पण सगळे भारतीय आहेत. भारतीयत्वाचा, राष्ट्रीयत्वाचा संबंध हिंदू संस्कृती, इतिहास आणि वारशासोबत आहे. सिंधू खोऱ्यातून जे आले, ते हिंदू इतका सोपा त्याचा अर्थ आहे", असे नितीन गडकरी हिंदुत्वाबद्दल बोलताना म्हणाले.
"हिंदू हा जातीवाचक शब्द नाहीये आणि हिंदू हा सांप्रदायिक शब्द नाहीये. हिंदुत्व ही जीवनपद्धती आहे. तसा भारतीय समाज आम्हाला निर्माण करायचा आहे. त्यात प्रत्येक व्यक्तिला धर्म स्वातंत्र्य आहे. आपण लोक समजून न घेता हिंदूत्व म्हणजे अल्पसंख्याक विरोधी, मुस्लीम विरोधी. आम्ही ना बहुसंख्याक मानतो, ना अल्पसंख्याक आम्ही असं मानतो की, हा संपूर्ण समाज आपला आहे", अशी भूमिका गडकरींनी हिंदुत्वाबद्दल बोलताना मांडली.