दिल्ली संमेलन सर्वार्थाने ‘अभिजात’ ठरेल; माजी संमेलनाध्यक्ष, साहित्यिकांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 06:30 IST2025-01-12T06:30:04+5:302025-01-12T06:30:34+5:30

तीन दिवसांपूर्वीच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठीला अभिजात दर्जा दिल्याच्या शासन आदेशावर कार्यवाहीची मोहर उमटवत अधिसूचना महाराष्ट्राकडे सुपूर्द केली.

Delhi Conference will be 'Classical' in every sense; Former Conference President, Writers Confident | दिल्ली संमेलन सर्वार्थाने ‘अभिजात’ ठरेल; माजी संमेलनाध्यक्ष, साहित्यिकांना विश्वास

दिल्ली संमेलन सर्वार्थाने ‘अभिजात’ ठरेल; माजी संमेलनाध्यक्ष, साहित्यिकांना विश्वास

 - स्वप्नील कुलकर्णी

मुंबई : नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे संमेलन सर्वार्थाने साहित्य संमेलनाच्या परंपरेतील ‘अभिजात’ संमेलन ठरेल, असा विश्वास माजी संमेलनाध्यक्ष, साहित्यिकांनी व्यक्त केला.

गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळाला. तीन दिवसांपूर्वीच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठीला अभिजात दर्जा दिल्याच्या शासन आदेशावर कार्यवाहीची मोहर उमटवत अधिसूचना महाराष्ट्राकडे सुपूर्द केली. त्यामुळे या दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. संमेलनाबद्दल बोलताना मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनी सांगितले की, मराठीला अभिजात दर्जा मिळणं हीच आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे.

यंदाच्या संमेलनात वेगवेगळ्या विषयांवरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काव्य कट्टा, मुलाखती, परिसंवादाबरोबर अभिनेत्री मधुरा वेलणकर यांचा ‘मधुरव’ कार्यक्रमदेखील होणार आहेत. सध्या कार्यक्रम पत्रिका आणि निमंत्रण पत्रिकेचे काम सुरू असून, त्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे.

पहिल्याच दिवशी अभिनंदनाचा ठराव
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोट्यवधी मराठी रसिकांच्यावतीने अभिनंदन करणारा ठराव मांडण्यात येणार आहे. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे या अभिनंदनाचा ठराव मांडणार आहेत.

साहित्य संमेलनांमधून मराठी अस्मिता दिसून येते. साहित्य संमेलने ही मराठी समाजाचा ‘वाङ्मयीन उत्सव’ आहे. या साहित्याच्या उत्सवाला लोक जात-धर्म विसरून येत असतात आणि भविष्यातही येतील. या संमेलनाला मराठी भाषेची ‘अभिजात’रूपी समृद्ध आणि सर्वांनी केलेल्या प्रयत्नांची किनार मिळाली आहे. हे संमेलनदेखील अभूतपूर्व होईल, याचा विश्वास वाटतो.
- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद

Web Title: Delhi Conference will be 'Classical' in every sense; Former Conference President, Writers Confident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.