Decrease in the number of deaths due to swine flu - Health Minister | स्वाइन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट - आरोग्यमंत्री
स्वाइन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट - आरोग्यमंत्री

मुंबई : राज्यामध्ये स्वाइन फ्लूच्या प्रादुर्भावामुळे होणाºया मृत्यूच्या प्रमाणात मे महिन्यापासून घट झाली आहे. गेल्या सुमारे २५ दिवसांमध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून रुग्णसंख्येतदेखील घट झाली आहे. राज्यात पुणे पालिकेच्या क्षेत्रात केवळ दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्याच्या आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

आरोग्य विभागामार्फत जानेवारी २०१९ पासून मे अखेरपर्यंत ९ हजार व्यक्तींना लसीकरण केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. विभागामार्फत स्वाइन फ्लूसदृश्य रुग्णांचे नियमित सर्वेक्षण केले आहे. आतापर्यंत राज्यभरात सुमारे ११ लाख ७५ हजार रुग्णांची तपासणी केली. २१ हजार रुग्णांना ऑसेलटॅमिविर गोळ्या दिल्या. सध्या १०५ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. जानेवारी ते मे अखेर स्वाइन फ्लूमुळे १७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

२५ दिवसांत एकही मृत्यू नाही
गेल्या २५ दिवसांत एकही मृत्यू झालेला नाही. जानेवारीमध्ये ११७ रुग्ण आढळून आले तर या संपूर्ण महिनाभरात २६ रुग्णांचा मृत्यू झाला. फेब्रुवारीमध्ये ४०१ रुग्ण आढळून आले तर ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. मार्चमध्ये ५८५ रुग्ण आढळून आले तर ६३ रुग्णांचा मृत्यू झाला. एप्रिलमध्ये ३२८ रुग्ण आढळून आले तर ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. मे महिन्यात १८८ रुग्ण आढळले त्यापैकी चार रुग्णांचा मृत्यू झाला. १० मेनंतर राज्यात स्वाइन फ्लूमुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.


Web Title: Decrease in the number of deaths due to swine flu - Health Minister
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.